उमेदवारांचा सोशल मीडिया आयोगाच्या स्कॅनरवर

social-media

सध्या सोशल मीडिया अतिशय प्रभावशाली माध्यम असल्याने विधानसभा निवडणुकीतील प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रचंड वापर होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांच्या सोशल मीडियावरील जाहिराती व पेड न्यूजबरोबर उमेदवारांच्या खर्चावर विशेष लक्ष देण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक निरीक्षक शिदौनसिंग भदोरिया यांनी आज दिले.

निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी दोन विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यापैकी शिदौनसिंग भदोरिया यांनी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातील मीडिया सेलला भेट दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय व केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार निवडणूक रिंगणातील उमेदवाराचे फेसबुक, ट्विटर, यू टय़ूब, इन्स्टाग्राम, व्हॉटस्ऍप इ. समाज माध्यमांवर लक्ष ठेवून परवानगी न घेता आणि खर्च न दाखविता प्रचाराचा मजकूर प्रसिद्ध झालेला आढळल्यास तत्काळ कार्यवाही करावी. यावेळी त्यांनी मीडिया सेलमधील सोशल मीडियाच्या अहवालाची तपासणी केली आहे. मीडिया सेलच्या कामाचे कौतुक केले. मीडिया सेलचे समन्वयक प्रमुख डॉ. राजू पाटोदकर यांनी या सेलच्या कामकाजाची सविस्तर माहिती भदोरिया यांना दिली.

व्हॉटस्ऍपवरील प्रचार आला अंगलट

समाजमाध्यमांद्वारे केवळ एका क्लिकवर शेकडो लोकांपर्यंत पोहचता येते. त्यामुळे अनेक उमेदवार या निवडणुकीत समाजमाध्यमांचा अत्यंत खुबीने वापर करताना दिसत आहेत. नांदेडमध्ये व्हॉटस्ऍपद्वारे करण्यात येणारा प्रचार चांगलाच अंगलट आला आहे. 12 ग्रुप ऍडमिन्सना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. सोशल मीडियाचा वापर करून मतदारांना ठरावीक उमेदवारांकडे आकर्षित करणाऱ्या पोस्ट सर्रास फिरत आहेत. अमुक व्यक्तीला विजयी करा, तमुक व्यक्तीला मतदान करू नका, एखादा उमेदवार कसा वाईट आहे अशा आशयाच्या अनेक पोस्ट समाजमाध्यमांवर फिरत आहेत. याची गंभीर दखल घेऊन नांदेडमधील 12 ग्रुप ऍडमिन्सना पुराव्यानिशी नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या