अनिल देशमुख यांच्या चौकशीची कागदपत्रे द्या! सीबीआयची हायकोर्टात याचिका

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित चौकशीची कागदपत्रे देण्याचे न्यायालयाने राज्य सरकारला आदेश द्यावेत अशी मागणी करत सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात येणार आहे.

अनिल देशमुखांवरील खंडणीच्या कथित आरोपाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी 22 जुलै रोजी न्यायालयाने पोलिसांच्या बदल्या व अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत सीबीआयला तपास करण्याची परवानगी दिली होती. असे असताना राज्य सरकारने अद्याप त्यासंदर्भातील कागदपत्रे आपल्याला सुपूर्द केलेली नाहीत असा दावा करत सीबीआयने उच्च न्यायालयात आज याचिका दाखल केली आहे. रश्मी शुक्ला व त्यांच्याशी संबंधित चौकशीची कागदपत्रे मागण्यासाठी इंटेलिजन्स डिपार्टमेंटला पत्र लिहिण्यात आले होते. मात्र राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यायचे असल्याने सदर कागदपत्रे देता येणार नाहीत असे उत्तर दिल्याचे सीबीआयने याचिकेत म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या