मोदींशी ‘चाय पे चर्चा’ करणाऱ्या शेतकऱ्याची आत्महत्या

45

सामना ऑनलाईन । यवतमाळ

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात सहभागी झालेल्या यवतमाळमधील एका शेतकऱ्याने कर्जाच्या बोज्यामुळे आत्महत्या केली आहे. कैलास किसन मानकर (२८) असे त्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली आहे. राज्य सराकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असली तरी अद्याप बऱ्याच शेतकऱ्यांची कर्ज माफ झालेली नाही. कर्जमाफीतील गोंधळामुळे शेतकरी वैतागले असून त्यालाच कंटाळून कैलास यांनी आत्महत्या केली आहे.

अरनी तालुक्यातील दाभाडी गावात कैलास हे आई, दोन लहान भाऊ व एका बहिणीसोबत राहायचे. त्यांच्याकडे तीन एकर जमीन असून त्यावर त्यांनी कापसाचे पीक घेतले होते. यावर्षी त्यांच्या शेतातील कापसाचे बोंडअळीमुळे मोठे नुकसान झाले होते. २०१२ साली कैलास यांच्या वडिलांचे निधन झाल्यापासून ते घराच एकमेव कमावते होते.

‘शेतात नुकसान झाल्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते. त्यांनी शेतीसाठी जिल्हा सहकारी बॅंकेकडून तीस हजार व सावकाराकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. शेतीतील नुकसानीमुळे त्यांना त्याची परतफेड करता येत नव्हती. सावकार व बॅंकाकडून कर्जाच्या हफ्त्यासाठी तगादा लावला होता. तसेच मे महिन्यात आमच्या बहिणीचे लग्न आहे. त्यासाठी देखील पैसे जमा करायचे होते’, असे कैलास यांचे भाऊ ज्ञानेश्वर यांनी सांगितले होते.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाभाडी गावात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात कैलास देखील सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या