दादर येथे आज शाहिरी लोकरंग

लोककलेला नवसंजीवनी मिळावी, या उद्देशाने स्थापन झालेल्या शाहिरी लोक कला मंच या संस्थेचा पाचवा वर्धापन दिन 28 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता दादरच्या शिवाजी मंदिर नाटय़गृहात साजरा होणार आहे.

 शिवकाळात किंवा त्याही पूर्वीपासूनच लोकजीवनात शौर्याचे, समाज  प्रबोधनाचे आणि लोकरंजनाचे स्फुल्लिंग फुलवीत आलेली शाहिरी लोककला स्वातंत्र्यलढय़ात व त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तळपत्या तलवारी प्रमाणे तळपली आणि तिने इतिहास घडवला. बदलेल्या काळानुसार संगीत बदलले आणि लोकरूचीही बदलली. या एकूण प्रवाहात हृदयाचा  ठाव घेणारी शाहिरी लोककला मागे पडत गेली. या लोककलेचे पुनरुज्जीवन व्हावे, यासाठी मुंबईतील सर्व शाहिरांनी एकत्र येऊन शाहिरी लोक कला मंचची स्थापना केली. बुजूर्ग शाहिरांपासून युवा शाहिरांपर्यंत शाहिरी लोककला पोहोचविण्याचा प्रयोगही यशस्वी करण्यात आला.

लोकनाटय़, पोवाडे, लावणी, गवळण, बतावणी इत्यादी पारंपरिक पध्दतीने रसिकांच्या हृदयात  पुन्हा आपले स्थान निर्माण करण्यासाठी शाहिरी लोककला सज्ज झाली आहे. कार्यक्रमाचे लेखन शाहीर मधू खामकर, संगीत संयोजन संगीतकार  मनोहर गोलांबरे यांनी केले आहे. नृत्य दिग्दर्शन गणेश कारंडे यांनी केले आहे. निर्मितीत अध्यक्ष शाहीर शांताराम चव्हाण आणि खजिनदार महादेव खैरमोडे यांनी पुढाकार घेतला आहे. कार्यक्रमाचे समन्वयक काशिनाथ माटल आहेत. शाहिरी लोकरंग कार्यक्रमातून रसिकांना काळाच्या पडद्याआड गेलेली अविट गोडीची लोकगीते, पोवाडे, लावण्या यांची पर्वणी मिळणार आहे.