शिवसेनेसोबत स्थिर आणि लोकाभिमुख सरकार देणार; काँग्रेस, राष्ट्रवादीचा ठाम विश्वास

2391

महाराष्ट्रात गेल्या 21 दिवसांपासून असलेली अस्थिरता लवकरच संपुष्टात येऊन कोणत्याही क्षणी राज्यात सरकार स्थापन होईल. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन राज्यात स्थिर व मजबूत सरकार देतील, असा विश्वास काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी बुधवारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. सत्तास्थापनेच्या दृष्टीने आवश्यक मुद्दय़ांवर पुढील दोन-तीन दिवस चर्चा सुरू राहणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

विधानसभा निवडणुकीत  कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला पेच सुटावा यासाठी शिवसेनेसोबत मिळून सरकार स्थापन करण्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. सोमवारी शरद पवार यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनीही राज्यातील राजकीय अस्थिरता दूर करण्याबाबत सोनिया गांधींशी चर्चा केली. यानंतर सायंकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पवार यांच्या निवासस्थानी पार पडली. तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करताना कोणता समान कार्यक्रम असावा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. गरुवारीही दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे.

या बैठकीला राष्ट्रवादीकडून पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, नवाब मलिक हे उपस्थित होते, तर काँग्रेसकडून अहमद पटेल, के.सी. वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चक्हाण, नसीम खान आदी नेते उपस्थित होते.

महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी दोन्ही पक्षांनी आज प्रदीर्घ चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाली. ही चर्चा अंतिम टप्प्यात असल्याने महाराष्ट्रात लवकरात लवकर स्थिर व लोकाभिमुख सरकार स्थापन होईल- पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून राज्यातील प्रशासन ठप्प आहे. शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे राज्यात नवं सरकार यावं ही सर्वांचीच इच्छा असल्याने आमची सकारात्मक चर्चा सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन स्थिर सरकार देतील- नवाब मलिक, राष्ट्रवादी प्रवक्ते

शिवसेनेसोबतच्या आघाडीस सोनिया गांधींची संमती

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या एकत्रित बैठकीआधी काँग्रेस नेत्यांची पक्ष मुख्यालयात बैठक झाली. यावळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्यास महाराष्ट्रातील नेत्यांना संमती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

आपली प्रतिक्रिया द्या