काँग्रेस, राष्ट्रवादीची आजही बैठक,पत्रकारांना गुंगारा देऊन बुधवारी पहिली बैठक झाली

935

राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी रात्री पार पडली. विशेष म्हणजे बैठकीच्या ठिकाणाचा थांगपत्ता लागू नये यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पत्रकारांना चांगलाच चकवा दिल्याचे पहायला मिळाले. या दोन्ही पक्षांची उद्या गुरुवारीही बैठक होणार आहे.

या बैठकीत काय ठरले हे समजले नसले तरी या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे,  छगन भुजबळ, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नवाब मलिक यांच्यासह दोन्ही पक्षांचे इतरही नेते उपस्थित होते. गुरुवारीही आमची बैठक होणार आहे, असे थोरात यांनी सांगितले आहे.

सकाळी राष्ट्रवादीची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आणि संध्याकाळी ‘सिल्व्हर ओक’ येथे तर सायंकाळी काँग्रेसची दादरच्या  टिळक भवनात बैठक झाली. आज सायंकाळी साडेसात वाजता बैठक घेऊया, असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठरवले होते. पत्रकारांनाही ते समजले होते. त्यामुळे टीव्ही पत्रकारांनी सिल्व्हर ओक आणि टिळक भवनात ठिय्याच मांडला होता.

दोन्ही पक्षांची  बैठक होणार होती तेथपर्यंत पत्रकारांना पोहचू द्यायचे नाही, असे काँग्रेस-राष्ट्रवादीने ठरवले होते. पत्रकारांना गुंगारा देण्यासाठी मग सगळेच सरसावले आणि अजित पवार यांनी ‘बारामतीला जातो’ एवढेच सांगून जयंत पाटील यांच्यासह ‘सिल्व्हर ओक’ सोडले. त्यानंतर लागलीच ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या… ‘काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक रद्द.’ तिकडे टिळक भवनातही अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांनी उलटसुलट विधाने करून या ब्रेकिंग न्यूजला अधिकच हवा दिली.

थोडय़ा वेळाने जयंत पाटलांनी खुलासा केला की, एका अज्ञात ठिकाणी आमची बैठक सुरू असून आघाडीत कोणताही बेबनाव नाही. विशेष म्हणजे ब्रेकिंग न्यूज थांबल्या आणि बैठकीचा फोटो दाखवण्यास वाहिन्यांनी सुरू केले.

आपली प्रतिक्रिया द्या