आज काँगेस–राष्ट्रवादीची राजधानीत बैठक, सत्तास्थापनेच्या हालचालींचे केंद्र दिल्लीत

1303

राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींचे केंद्र आता मुंबईतून नवी दिल्लीकडे सरकले असून राजकीय चर्चा-बैठका सुरू झाल्या आहेत. आज काँगेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. तर उद्या मंगळवारी काँगेस आणि राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांची बैठक होणार आहे. हा बैठकांचा सिलसिला निर्णायक असून लवकरच सत्तास्थापनेचा पेच सुटेल, असे काँग्रेसने आज सांगितले.

शरद पवार आणि सोनिया गांधी यांची रविवारी होणारी बैठक काही कारणास्तव रद्द झाली होती. मात्र मंगळवारी दुपारी सवाचारच्या सुमारास पवार सोनिया यांच्या दहा जनपथ या निवासस्थानी दाखल झाले. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली. या बैठकीस ज्येष्ठ काँगेस नेते ए.के. ऍण्टोनीसुद्धा उपस्थित होते.

या भेटीनंतर शरद पवार यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली आणि चर्चेची माहिती दिली. काँगेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची निवडणूकपूर्व आघाडी आहे. आम्हाला अजून अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे पवार म्हणाले. आमच्या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, कवाडे गट हे छोटे पक्षही सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा, त्यांना विश्वासात घेऊनच आम्हाला पुढे सरकावे लागेल, तूर्तास आम्ही महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असेही पवार यांनी सांगितले.

दोन्ही पक्षांतील नेत्यांचे मत

मुंबईत शिवसेनेसोबत काँगेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या औपचारिक बैठका पार पडल्या आहेत. आता सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर काँगेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. त्यांचे मत विचारात घेतले जाईल आणि त्यानंतरच पुढील निर्णय घेऊ, असेही पवार म्हणाले. दरम्यान, या दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक उद्या मंगळवारीच होणार असून नेतेमंडळी उद्या सकाळपर्यंत नवी दिल्लीत दाखल होतील, असे सांगण्यात आले.

भाजपविरोधात लढलोय; त्यांच्यासोबत जाणार नाही!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रवादीचे कोडकौतुक केले होते. त्या अनुषंगाने आपला पक्ष भाजपासोबत सत्तेत सामील होणार का, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता, आम्ही कोणाविरोधात जनादेश मागितला आहे, असा प्रतिसवाल पवारांनी पत्रकारांना केला. आम्ही भाजपाविरोधात लढून इथवर आलोय. आता त्यांच्यासोबत जाणार नाही, अशी स्पष्टोक्तीही पवारांनी दिली.

सोनिया गांधी यांनी माझ्याशी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. पाठिंबा देणारे आमदार आणि दोन्ही पक्षांच्या आमदारांची संख्या जाणून घेतली. या बैठकीत इतर कोणत्याही मुद्दय़ावर चर्चा झाली नाही. आम्ही आमच्या पक्षाच्या राजकीय स्थितीबाबत चर्चा केली. काँगेस-राष्ट्रवादीचे नेते त्यांची बैठक घेतील आणि बैठकीनंतर त्यांचा दृष्टिकोन मला सांगतील. त्यानंतर काय भूमिका घ्यायची, रणनीती ठरवायची याचा निर्णय घेऊ – शरद पवार अध्यक्ष, राष्ट्रवादी काँगेस

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी आज महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत चर्चा केली. या चर्चेत येत्या एक-दोन दिवसांत महाराष्ट्राबाबत पुढील निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले. येत्या एक-दोन दिवसांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होईल. या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय पेच सोडविण्याबाबत पुढे कोणती भूमिका घ्यायची याचा निर्णय होईल- रणदीपसिंग सुरजेवाला काँग्रेस प्रवक्ते

आपली प्रतिक्रिया द्या