चिंता नको… मध्यावधी लागणार नाहीत!

1331
sharad-pawar

राज्यात राष्ट्रपती राजवट लागली असली तरी चिंता करू नका. मध्यावधी निवडणुका होणार नाहीत अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना आश्वस्त केले आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक आज पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना पवार यांनी आमदारांना पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे लागणार नाही असा दिलासा देतानाच सत्ता स्थापनेसंदर्भात आमच्या सकारात्मक बैठका सुरू आहेत. आपण राज्यात निश्चितच स्थिर सरकार देऊ असेही ठामपणे सांगितले.

टीव्ही पत्रकारांना झापले; उद्यापासून इकडे येऊ नका!

‘सिल्व्हर ओक’ येथील बैठकीनंतर सायंकाळी राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह बाहेर पडले. तेव्हा टीव्ही पत्रकारांनी त्यांना काँग्रेस- राष्ट्रवादीच्या बैठकीबद्दल विचारले तेव्हा अजितदादा म्हणाले, बैठक रद्द झाली. मी बारामतीला चाललो. त्यानंतर वृत्तवाहिन्यांवर लगेचच अजित पवार यांच्या नाराजीची ब्रेकिंग न्यूज झळकू लागली. वेगवेगळे तर्कवितर्क लढू लागले. अखेर खुद्द शरद पवार बाहेर आले आणि त्यांनी टीव्ही पत्रकारांना चांगलेच झापले.

शरद पवार म्हणाले, तुम्ही जे दाखवताय ते बरोबर नाही. कुणाच्याही खासगी आयुष्यात घुसू नका. असेच जर तुम्हाला करायचे असेल तर उद्यापासून येथे येऊ नका. मी तुमच्याशी बोलणार नाही. अजित पवार मुंबईतच आहेत. ते चेष्टेने बारामतीला जातो म्हणाले. कारण तुम्हाला कुठे जाणार हे सांगितले तर लगेच तुमच्या गाडय़ा पाठलाग करतात. एवढे बोलून पवार आत निघून गेले.

आपली प्रतिक्रिया द्या