मोदींना अंधारात का ठेवलं? शिवसेनेचा अमित शहांना रोखठोक सवाल

638
amit-shah

‘भाजपा-शिवसेना युतीमध्ये झालेली चर्चा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत झाली होती. भाजपासाठी ती बंद दाराआडची चर्चा असेल, पण शिवसैनिकांसाठी ती सामान्य खोली नाही तर मंदिर आहे. त्या मंदिरात झालेली चर्चा कुणी नाकारत असेल तर तो शिवसेनाप्रमुखांचा, महाराष्ट्राचा अपमान आहे ’ असा घणाघात करतानाच शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ‘त्या चर्चेत ठरलेल्या फॉर्म्युल्याबाबत नरेंद्र मोदींना अंधारात का ठेवले’, असा खणखणीत सवाल भाजपाध्यक्ष अमित शहा यांना केला आहे.

बंद दाराआड झालेली चर्चा उघड करणार नाही असे वक्तव्य अमित शहा यांनी बुधवारी एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. त्याला संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान मोदी यांच्यापासून सत्य लपवून शिवसेना आणि मोदी यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे खासदार राऊत यावेळी म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात झालेली चर्चा मोदींपर्यंत पोहचवलीच न गेल्याने हा गोंधळ झाला असून ती चर्चा उघड करून शहा यांनी हा गोंधळ दूर करावा, असे संजय राऊत म्हणाले. शिवसेनाप्रमुखांनी त्याच खोलीमध्ये  थोरामोठय़ांना आशीर्वाद दिले आहेत. त्या खोलीतच मुख्यमंत्रीपदासह सत्तेच्या समसमान वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता हे मी शिवसेनाप्रमुखांची शपथ घेऊन सांगतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन आम्ही खोटं बोलणार नाही, असे खासदार राऊत म्हणाले.

महायुतीला बहुमत मिळाले तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी घोषणा अनेक सभांमध्ये केली गेली. त्यावेळी शिवसेनेने आक्षेप का घेतला नाही, असा सवालही शहा यांनी केला होता. त्यावर पंतप्रधान हे आमच्यासाठी आदरणीय असून त्यांना खोटे पाडून त्यांचा अपमान करण्याची आमची इच्छा नव्हती, असे संजय राऊत म्हणाले. आम्हीही शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आणि सत्तेच्या समसमान वाटपाबद्दल बोलत होतो तेव्हा भाजपाने का आक्षेप घेतला नाही, असा प्रतिसवालही त्यांनी केला.

शिवसेनाप्रमुखांनी त्याच खोलीमध्ये अनेक थोरामोठय़ांना आशीर्वाद दिले आहेत. त्या खोलीतच मुख्यमंत्रीपदासह सत्तेच्या समसमान वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता हे मी शिवसेनाप्रमुखांची शपथ घेऊन सांगतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन आम्ही खोटं बोलणार नाही- संजय राऊत, शिवसेना नेते

मुख्यमंत्रीपद शिवसेनेलाच

मुख्यमंत्रीपदामुळेच शिवसेना भाजपपासून बाजूला झाली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान राखणे, स्वाभिमान जिवंत ठेवणे ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. परंतु उपमुख्यमंत्रीपदाबाबत अजून काही ठरलेले नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले.

पवार-सोनिया रविवारी चर्चा

शिवसेना आणि आघाडीचे किमान समान कार्यक्रमावर एकमत झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात चर्चा होणार आहे. रविवार, 17 नोव्हेंबरला पवार नवी दिल्लीत जाऊन सोनियांची भेट घेतील असे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या