राज्यपालांच्या ‘विश्रांतीयोगा’मुळे खातेवाटप पुन्हा लांबले!

3397

राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे खातेवाटप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. खातेवाटपाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मंजुरीसाठी रात्री 9.45 वाजता राजभवनवर रवानाही करण्यात आली. राज्यपाल तत्काळ स्वाक्षरी करतील अशी अपेक्षा होती. मात्र राज्यपाल विश्रांती घेत असल्याने ते उद्या सकाळीच या यादीवर मंजुरीची स्वाक्षरी करतील असे सांगण्यात आले. राज्यपालांच्या ‘विश्रांतीयोगा’मुळे मंत्रिमंडळाचे खातेवाटप पुन्हा रखडले.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा 30 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतर मंत्र्यांना बंगला आणि दालनाचे वाटपही झाले. मात्र खातेवाटप अंतिम होत नव्हते. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील ज्येष्ठ मंत्र्यांच्या बैठकाही झाल्या. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर खातेवाटप पूर्ण केले आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही यादी मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठविण्यात आली.

राज्यपालांच्या मंजुरीनंतर खातेवाटपाची अधिकृत घोषणा होईल आणि यादी जाहीर होईल अशी प्रसारमाध्यमांना अपेक्षा होती; मात्र रात्री साडेनऊच्या सुमारास यादी पाठवूनही रात्री उशिरापर्यंत राजभवनात त्यावर मंजुरीची मोहोर उमटली नाही.

राज्यपाल उद्या सकाळी खातेवाटपाच्या यादीवर स्वाक्षरी करतीलच. पण आज मंत्रालयात या यादीचीच चर्चा होती. मंत्रालय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खातेवाटप असे असू शकते…

 • एकनाथ शिंदे – नगरविकास
 • सुभाष देसाई – उद्योग
 • आदित्य ठाकरे – पर्यावरण, पर्यटन
 • अनिल परब – परिवहन
 • संजय राठोड -वन
 • उदय सामंत -उच्च व तंत्रशिक्षण
 • दादा भुसे – कृषी
 • संदीपान भुमरे – रोजगार हमी
 • गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
 • शंकरराव गडाख – जलसंधारण
 • अजित पवार – अर्थ
 • अनिल देशमुख – गृह
 • जयंत पाटील – जलसंपदा
 • छगन भुजबळ – अन्न व नागरीपुरवठा
 • नवाब मलिक – अल्पसंख्याक
 • बाळासाहेब थोरात – महसूल
 • अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम
 • वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण


शरद पवार यांची कोपरखळी; राज्यपाल महोदय, हे वागणं बरं नव्हं!

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी खातेवाटपासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या प्रस्तावावर आज रात्री सही केली नाही. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

जे राज्यपाल पहाटे उठून राजभवनात देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना शपथ देतात व त्यासाठी राजभवन उघडे ठेवतात तेच राज्यपाल मंत्रिमंडळ खातेवाटपाच्या प्रस्तावावर सही न करता झोपायला जातात हे घटनात्मक आश्चर्यच म्हणायला हवे, अशी कोपरखळी शरद पवार यांनी मारली.

आपली प्रतिक्रिया द्या