वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ

291

राज्यातील अठरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व तीन दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात दहा हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे निवासी डाँक्टरांना यापुढे सुमारे 64 ते 71 हजार रुपये मानधन मिळेल.

यानुसार वनिष्ठ निवासी व वरिष्ठ निवासी डाँक्टरांच्या सध्याच्या विद्यावेतनात 10 हजार रुपये वाढ याच महिन्यापासून करण्याचा निर्णय झाला. यामुळे सरकारच्या तिजोरीवर 29 कोटी 67 लाख 60 हजार रुपयांचा वाढीव बोजा पडेल.

निवासी डॉक्टर चोवीस तास सेवा देत असल्याचे सेंट्रल मार्ड संघटनेने निदर्शनास आणले होते. राज्यात कोरोनामुळे निवासी डॉक्टर अहोरात्र रुग्णसेवा देत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. सध्या महाराष्ट्रात निवासी डाँक्टरांना दरमहा 54 हजार रुपये, गुजरात मध्ये 63 हजार, बिहारमध्ये 65 हजार आणि उत्तर प्रदेशात 78 हजार एवढे विद्यावेतन देण्यात येते.महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांना विद्यावेतनात वाढ केल्याचा निर्णय झाल्यामुळे कनिष्ठ निवासी आणि वरिष्ठ निवासी यांचे सुधारित विद्यावेतन हे 64 हजार 551 रुपयांपासून पासून 71 हजार 247 रुपयांपर्यंत होईल. तर दंत पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे सुधारित विद्यावेतन 49 हजार 648 रुपयांपासून 55 हजार 258 रुपये इतके होईल.

आपली प्रतिक्रिया द्या