तिघांचं सरकार पाच वर्षे टिकेल! शरद पवार यांना ठाम विश्वास

570

राज्यात नवे सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी आम्हाला 6 महिन्यांची मुदत दिली आहे.  लवकरच सरकार स्थापन होईल आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँगेस असे तिघांचे हे सरकार पुढील पाच वर्षे सुरळीत कारभार चालवेल असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले की, किमान समान कार्यक्रम बनवण्याबाबत आमची काँग्रेस आणि शिवसेनेशी चर्चा सुरू झाली असून ती सुरळीत सुरू आहे. लवकरच हा कार्यक्रम निश्चित होईल आणि आम्ही सरकार गठीत करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. नवे सरकार गठीत करताना मुख्यमंत्री कोणाचा असेल याबाबत विचारले असता, ज्यांचा मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह आहे त्यांच्या मागणीचा निश्चित विचार होईल असे पवार यांनी स्पष्ट केले. आमची महाराष्ट्रात स्थिर सरकार यावे ही इच्छा असून त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. मुख्यमंत्री कोणाचा हा प्रश्न चर्चेतून सोडवू असे ते म्हणाले.

शिवसेनेचे हिंदुत्व आड येणार नाही

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सेक्युलर पक्ष असल्यामुळे शिवसेनेशी जुळवून कसे घेणार असे विचारले असता याबाबत किमान समान कार्यक्रम ठरवताना चर्चा होणार असल्याचे पवार यांनी सांगितले. आम्ही दोन्ही पक्ष सेक्युलॅरिझम मानणारे आणि आचरणात आणणारे आहोत. अशावेळी शिवसेनेचे कडवे हिंदुत्व आड येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस ज्योतिषी आहेत हे ठाऊक नव्हते!

राज्यात भाजपशिवाय दुसरे कोणतेही सरकार स्थापन होणार नाही असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले असल्याबाबत पवारांना विचारले असता ते म्हणाले, बरं झाले त्यांनी  हे सांगितले. नाही तर माझ्या डोक्यात फडणवीसांचे ‘मी पुन्हा येईन’, ‘मी पुन्हा येईन’ हेच एकमेव विधान होते. फडणवीसांना अनेक वर्षांपासून ओळखतो, मात्र ते भविष्यही चांगले ओळखतात हे माहीत नव्हते असा टोला त्यांनी लगावला.

दादांना अजूनही वाटतंय भाजपचंच सरकार येणार!

एकीकडे चिंतन बैठकीत आमदार आपापसात सरकार येणार नसल्याबद्दल चिंता व्यक्त करीत असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मात्र अजूनही वाटतेय की राज्यात सरकार भाजपचेच येणार.

वसंत स्मृती येथील चिंतन बैठकीच्या निमित्ताने पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यात भाजप एक क्रमांकाचा पक्ष असून भाजपचे 105 आमदार व 14 अपक्ष मिळून 119 संख्याबळ होते. भाजप वगळून राज्यात सरकार स्थापन होऊच शकत नाही. त्यामुळे राज्यात भाजपचेच सरकार येणार असून मुख्यमंत्रीदेखील भाजपचाच असेल. राज्यात सध्या ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत त्यावर आमचे लक्ष आहे असे सांगून पाटील यांनी भाजपच क्रमांक एकचा पक्ष कसा याचे गणित मांडले.

भाजपला 1 कोटी 42 लाख मते मिळाली, 164 जागा लढवून 105 जागा जिंकल्या, सर्वात जास्त 12 महिला आमदार भाजपच्याच आहेत, भाजप 59 जागांवर पराभूत झाला. त्यापैकी 55 जागांवर आम्ही दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत.

आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस राज्यपालांना भेटणार

अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांची भेट घेत आहेत. अशा शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी शनिवारी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे नेते राज्यपालांना भेटणार आहेत, अशी माहिती शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने अनेक प्रशासकीय कामे ठप्प झाली आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारकडून जाहीर झालेली मदत अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. त्याचप्रमाणे 10 हजार कोटींची मदत अपुरी असून हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत मिळावी यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत, असे सुभाष देसाई म्हणाले. त्याचप्रमाणे विविध रुग्णालयांमध्ये गरीब-गरजू रुग्ण आहेत. त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत देणारा कक्षच बंद झाला आहे. हा कक्ष सुरू व्हावा यासाठी उद्या राज्यपालांची भेट घेणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

राजकीय चर्चा नाही

या भेटीत राजकीय चर्चा न करता फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच चर्चा होणार आहे.  शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादीनेही शेतकऱ्यांना जाहीर झालेले पॅकेज अपुरे असून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 25 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी केली होती. त्यामुळे या मदतीसंदर्भातच या भेटीत चर्चा होणार असल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या