सीकेपी बँकेच्या ठेवीदारांना राज्य सरकार मदत करणार

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईसह राज्यातील मध्यमवर्गीयांचे मेहनतीचे पैसे असलेल्या सीकेपी बँकेच्या सुमारे 1 लाख 30 हजार खातेदारांना राज्य सरकार मदत करील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. मुंबई महानगर प्रदेश व सिडकोच्या हद्दीतील बँकेच्या मालमत्ता विकत घेऊन खातेदारांना व बँकेला मदत करण्याच्या दृष्टीनेही सरकार चाचपणी करणार आहे.

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ऍड. आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखाली सीकेपी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. या शिष्टमंडळात बँकेचे संचालक राजेंद्र फणसे यांच्यासह विजय गडकरी, दिलीप गुप्ते श्रीमती नलिनी सदलगी, रितू गुप्ते, ललिता फणसे आणि प्रशांत गुप्ते आणि प्रसाद महाडकर यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी मध्यवर्ती बँकेसोबत चर्चा करून या विषयात बँक वाचविण्यासाठी जे मार्ग मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अखत्यारीत येतात ते अवलंबावेत, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सहकारी मध्यवर्ती बँकेचे ऍडमिनिस्ट्रेटर विद्याधर अनास्कर यांना दिले.

आपली प्रतिक्रिया द्या