मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकार वटहुकूम काढणार; आयोगाला पत्र

सामना ऑनलाईन । मुंबई

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात मिळालेले कॉलेज आणि अभ्यासक्रम कायम राहावा यासाठी मराठा विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन सलग दहाव्या दिवशी सुरूच आहे. विद्यार्थी आंदोलनावर ठाम असल्याने सरकारदरबारी हालचालींना वेग आला आहे. राज्य सरकारकडून निवडणूक आयोगाला विद्यार्थ्यांसाठी आचारसंहिता शिथिल करण्याचे पत्र पाठविण्यात आले आहे. निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाल्यास येत्या दोन दिवसांत सरकार आधीची प्रवेश प्रक्रियाच कायम करण्यासाठी वटहुकूम काढणार आहे.

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे प्रवेश रद्द झालेल्या विद्यार्थी, पालक व मराठा समाजातील नेत्यांची बैठक बुधवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा समाजातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून या विषयावर मार्ग काढण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे परवानगी मागितली आहे. लवकरच त्यावर ठोस तोडगा काढण्यात येईल. निवडणूक आयोगाची परवानगी आल्यानंतर राज्य शासन तातडीने कार्यवाही करणार असून त्यासंबंधीच्या कायदेशीर बाबींची प्रक्रिया सुरू केली आहे.

मराठा विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवार यांची भेट
मराठा विद्यार्थी, पालकांकडून आपल्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी शिकस्त सुरू आहे. मराठा विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी मराठा विद्यार्थ्यांवर वैद्यकीय प्रवेशात अन्याय झाला असून सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी शरद पवार यांनी केली. छत्रपती संभाजीराजे यांनीही मराठा विद्यार्थ्यांची आझाद मैदान येथे भेट घेतली.

प्रवेश प्रकियेची अंतिम तारीख 31 मेपर्यंत; सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज
कैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशासंबंधी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवेश रद्द झालेल्या मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्रीमहोदयांनी केल्या आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे. तसेच नव्याने प्रवेश प्रक्रिया राबकिण्यासाठी 25 मे अंतिम तारीख असून ही तारीख 31 मेपर्यंत काढवून देण्याची विनंती करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आला आहे. तसेच कैद्यकीय पदव्युत्तरच्या जागा वाढकून मिळण्यासंबंधीही केंद्र शासनाकडे पत्र पाठविण्यात आले आहे.

वटहुकूम एमबीबीएस, इंजिनीअरिंगसह अन्य प्रवेशांसाठीही!
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार नीटने काढलेल्या अधिसूचनेची 1 नोव्हेंबर ही प्रवेशाची तारीख ग्राह्य धरण्यात आली आहे. या न्यायाने एमबीबीएस तसेच इंजिनीअरिंगच्या प्रवेशांमध्येही घोळ होऊ शकतो. हे टाळण्यासाठी काढण्यात येणारा वटहुकूम हा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांबरोबरच एमबीबीएस, इंजिनीअरिंगसाठीही लागू होणार आहे. यामुळे पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे 1 नोव्हेंबरपासून होणाऱ्या सर्व प्रवेशांसाठी 16 टक्के ईएसबीसी आरक्षण लागू होणार आहे.

100 जागा वाढविण्यासाठी केंद्राकडे पत्र
वैद्यकीय प्रवेशाचा गुंता सोडविण्यासाठी केंद्राकडेही पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. जागा वाढविण्यासाठीची प्रक्रिया ही वेळकाढू असली तरी महाराष्ट्रातील वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाच्या जागा वाढविण्यात याव्यात यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केंद्राकडेही पत्र पाठविले आहे.