शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी मदत, खरीपासाठी 8 हजार; बागायतीला हेक्टरी 18 हजार

2516
प्रातिनिधीक

अवकाळी पावसाने राज्यातील शेती उद्ध्वस्त झाली आहे. तब्बल 93 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशी भयंकर स्थिती असताना खरीप पिकांसाठी प्रति हेक्टर (अडीच एकर) 8 हजार रुपये तर बारमाही आणि बागायती पिकांसाठी 18 हजार रुपये हेक्टरी मदत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज जाहीर केली आहे. ही मदत देतानाही अटी-शर्ती टाकण्यात आल्या आहेत. केवळ दोन हेक्टरपर्यंतच्याच नुकसानीला मदत मिळणार आहे. दरम्यान, ही मदत अत्यंत तुटपुंजी असून, संकटात सापडलेल्या बळीराजाची चेष्टाच आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे राज्यभर दौरे करीत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात येत होती. राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी शनिवारी मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेती नुकसानीचा आढावा घेतला. या बैठकीत खरीप पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 8 हजार रुपये तर बारमाही पीक आणि बागायतदारांना हेक्टरी 18 हजार रुपये ही मदत जाहीर केली.  ही मदत तत्काळ वितरित करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. दरम्यान, दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसान झालेल्या पिकाला मदत मिळणार आहे. या अटीमुळे एखाद्या शेतकऱ्याचे चार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले असेल तर त्याला दोन हेक्टरच्या नुकसानीचीच भरपाई मिळेल.

अस्मानी संकटाने त्रासलेल्या शेतकऱ्यांवर सुलतानी जाच, धनंजय मुंडे यांची टीका

केंद्राचे पथक पाहणीसाठी येणार

राज्यातील पिकांचे झालेले नुकसानीची भरपाई केंद्राकडूनही देण्यात यावी अशी मागणी होत आहे. राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर झाल्यावर केंद्रीय पथक दुष्काळाची पाहणी करण्यासाठी दाखल झाले होते. राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू असल्याने केंद्राकडूनही शेतकऱ्यानां मदत मिळण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

गुंठ्याला 80 रुपये मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच, अखिल भारतीय किसान सभेची टीका

25 हजार कोटी रुपयांची आवश्यकता

अवकाळी पावसामुळे राज्यातील 93.89 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. याचा फटका 1 कोटी 4 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना बसला आहे. संभाजीनगर, अमरावती, नाशिक तसेच कोकणात मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून 10 हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यपालांनी जी मदत जाहीर केली ती तोकडी आहे. प्रत्यक्षात 25 हजार कोटी रुपयांच्या भरपाईची आवश्यकता आहे. मात्र आज जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्यामुळे शेतकऱ्यांना नेमकी किती मदत मिळणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

शेतकर्‍यांना जाहीर केलेल्या मदतीत वाढ करावी, काँग्रेसची मागणी

विद्यार्थ्यांचे शुल्क माफ

नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करण्यात आला आहे. या भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कही माफ करण्यात आल्याचे राज्यपालांनी जाहीर केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या