एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी हवे होते 360 कोटी, दिले 200 कोटी; शिंदे-फडणवीस सरकारने तोंडाला पाने पुसली

राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र सध्या दिसत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी दरमहा 360 कोटी रुपयांची गरज आहे; पण या सरकारने ऑक्टोबरच्या वेतनासाठी 200  कोटी रुपये दिले आहेत. यापूर्वीची वेतनाची थकबाकी व ऑक्टोबरच्या वेतनासाठी 790 कोटी रुपयांची मागणी केली आहे. पण सरकार एसटी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा कामगारांचा आरोप आहे.

डिसेंबर महिना उजाडला तरी  एसटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन थकले. त्यामुळे या वेतनापोटी आज राज्य सरकारने महामंडळाला 200 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला. मात्र ही रक्कम अपुरी आहे. कर्मचाऱ्यांचे दर महिन्याचे वेतन देण्यासाठी 360 कोटी रुपयांची गरज आहे. एसटी महामंडळाने मागील थकबाकी आणि ऑक्टोबरच्या वेतनासाठी सरकारकडे 790 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र महामंडळाला केवळ 200 कोटी रुपये मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन देणे शक्य होणार नसल्याचे महामंडळातील सूत्रांचे म्हणणे आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन महिने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक असलेली पूर्ण रक्कम दिली होती; पण सरकारने आतापर्यंत एकदाही वेतनाची पूर्ण रक्कम दिलेली नाही असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.