Election 2021 – शिवसेनेची जोरदार मुसंडी, महाविकास आघाडीच सरस

राज्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींचा निकाल सोमवारी जाहीर झाला. विकासाच्या राजकारणाला पाठिंबा देत राज्यातील ग्रामपंचयातींनी महाविकास आघाडीच्या पारडय़ात भरभरून मते टाकल्याचे या निकालाने स्पष्ट झाले. शिवसेनेने जोरदार मुसंडी घेत राज्यातील ग्रामीण भागांत भगवा डौलाने फडकवला. कोल्हापूर जिह्यातील खानापूर ग्रामपंचायत जिंकून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना त्यांच्या गावात धक्का दिलाच. शिवाय रत्नागिरी, नाशिक, बीडमध्ये जोरदार मुसंडी घेत सत्ता काबीज केली. शिवसेनेने तब्बल 3113 जागी दणक्यात विजय साजरा केला असून त्यापाठोपाठ राष्ट्रवादी 2400 जागी तर काँग्रेसला 1823 जागांवर दणदणीत यश मिळाल्याने या निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीच सरस ठरली तर भाजपला 2632 जागांवर वर्चस्व राखता आले. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेने मोठा विजय मिळवला असून मराठवाडय़ातील तब्बल दीड हजार ग्रामपंचायतींवर भगवा फडकला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सकाळी 11 वाजल्यानंतर स्पष्ट होण्यास सुरुवात झाली. एकापाठोपाठ एक येणाऱया या निकालांत भाजपला धक्का देत शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीपुरस्कृत पॅनेलनीही विजय पताका झळकवली. ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची करणाऱया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री राम शिंदे, रावसाहेब दानवे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार उदयन राजे भोसले या दिग्गजांच्या पॅनेलना त्यांच्या गावातच धूळ चारत महाविकास आघाडीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. महाविकास आघाडीतील मंत्री जयंत पाटील यांना म्हैसाळमध्ये, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पॅनेलला कराडमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

माजी मंत्री राम शिंदेना दे धक्का

विधानसभा निवडणुकीनंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीमध्येही राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदेना जोरदार धक्का दिला आहे. राम शिंदे यांच्या चौंडी या गावात रोहित पवारांच्या गटाला 9 पैकी 7 जागा मिळाल्या आहेत.

बीडमध्ये काका जयदत्त क्षीरसागर यांची आमदार पुतण्याला धोबीपछाड

बीड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत क्षीरसागर काका-पुतण्यामध्ये राजकीय लढाई रंगली होती. तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींपैकी 23 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पुतण्या आमदार संदीप क्षीरसागर यांना धोबीपछाड दिला. राष्ट्रवादीने 6 जागा मिळवल्या, तर भाजपाला एकही जागा मिळवता आली नाही.

कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना धक्का

माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या तालुक्यात महत्त्वाच्या दोन ग्रामपंचायतींवर भाजपच्या पॅनेलने विजय मिळवला आहे. शेणोली शेरे आणि कार्वे ग्रामपंचायतीतील झालेला पराभव हा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

जयंत पाटलांच्या सासरवाडीत सत्तांतर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सासरवाडी असलेल्या सांगली जिह्यातील म्हैसाळ ग्रामपंचायतीत सत्तांतर झालं आहे. पाटील यांचे मेव्हणे मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या पॅनलचा दारुण पराभव करत भाजपच्या गटाने याठिकाणी एक हाती सत्ता मिळवली आहे. शिंदे-म्हैसाळकर पॅनलची गेल्या दहा वर्षांपासून येथे सत्ता होती.

महाविकास आघाडीवर विश्वास – थोरात

विधान परिषदेच्या निवडणुकीप्रमाणेच मतदारांनी या निवडणुकीतही भाजपचा दारुण पराभव केला आहे. महाराष्ट्र विकास आघाडीला काैल देत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांवर विश्वास दाखवलेला आहे. या निकालातून महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कामावर जनतेने विश्वास दाखवला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

राज्यात भाजपच नंबर वन – फडणवीस

ग्रामपंचायत निवडणुकीत ज्याप्रकारे भाजपाला लोकांनी सर्मथन दिलं आहे त्याचा अतिशय आनंद आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मिळालेल यश हे अभुतपूर्व असल्याचे सांगत राज्यात भाजप नंबर वन असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

गावकारभाऱयांनो, संधीचे सोने करा – अजित पवार

मुंबई Š ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमधील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. गावकारभाऱयांनो, आता मिळालेल्या संधीचे सोने करा, जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक आहे. या ग्रामविकासाच्या प्रक्रियेत काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. गावाचा विकास करण्यासाठी लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी आता आणखी वाढली आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

रत्नागिरी जिह्यात शिवसेनेचा भगवा, सिंधुदुर्गात भाजपला यश

ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. अपेक्षेप्रमाणेच शिवसेनेने निकालात बाजी मारली आहे. 479 ग्रामपंचायतींपैकी 324 ग्रामपंचायतीत शिवसेना पुरस्कृत पॅनल विजयी झाले आहे. विजयानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला. काही ठिकाणी गाव पॅनल विजयी झाले असून पुढील काही दिवसांत शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याने ही संख्या वाढणार आहे.

रत्नागिरी जिह्यात निवडणूक जाहीर झालेल्या 479 ग्रामपंचायतींपैकी 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. 15 जानेवारी रोजी जिह्यातील 360 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. जिह्यात पुन्हा एकदा शिवसेनेने बाजी मारली आहे. सिंधुदुर्ग जिह्यात दोडामार्गमध्ये तिन्ही ग्रामपंचायतीवर शिवसेनेला निर्विवाद वर्चस्व मिळाले आहे. तर कणकवलीत तीनपैकी भिरवंडे व गांधीनगरमध्ये शिवसेनेने 7 पैकी 7 जागमिळवत भाजपला धक्का दिला आहे. एकंदर जिल्हा बँक अध्यक्ष, शिवसेनेचे सतीश सावंत यांनी नारायण राणेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे. तर पुन्हा एकदा देवगड तालुका भाजपचा बालेकिल्ला असल्याचे भाजपने सिद्ध केले आहे. शिवसेनेने 5 ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखीत एक ग्रामपंचायत राष्ट्रवादी व शिवसेना युतीकडे गेल्याचे निदर्शनास येत आहे. कुडाळ तालुक्यात शिवसेनेने 5 ग्रामपंचायतींवर निर्विवाद विजय मिळविला. वैभववाडी तालुक्यात 4 ग्रामपंचायतींवर शिवसेनेने भगवा फडकविला.

पुणे जिह्यात शिवसेनेची चमकदार कामगिरी, महाविकास आघाडीचे वर्चस्व

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेने पुणे जिह्यात चमकदार कामगिरी करून नव्याने अनेक ग्रामपंचायंतीवर भगवा फडकवाला आहे. जिह्यात महाविकास आघाडीने वर्चस्व मिळवले असून, भाजपाचा दणदणीत पराभव केला आहे. जिल्हापरिषद पदाधिकाऱयांनी आपले गड असलेले गाव राखण्यात यश मिळवले आहे. शिरुरचे आमदार अशोक पवार यांना त्यांच्या गावातच पराभव पत्करावा लागला, तर पुरंदरमध्ये शिवसेनेने स्वबळावर निविर्वाद वर्चस्व मिळावल्याने आमदार संजय जगताप यांना जोरदार धक्का दिला आहे. अटीतटीच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेने दमदार कामगिरी करत पुरंदर, जुन्नर ,आंबेगाव ,खेड शिरूर, भोर, मुळशी, हवेली या तालुक्यांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. बारामतीत तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखले.

मराठवाडय़ात दीड हजार ग्रामपंचायती शिवसेनेकडे

मराठवाडा हा शिवसेनेचा अभेद्य गडकोट असल्याचे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून सिद्ध झाले. मराठवाडय़ाच्या आठ जिल्हय़ांत 3273 ग्रामपंचायतींसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी करण्यात आली. यापैकी दीड हजार ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला आहे. मराठवाडय़ातील भाजपच्या गडकोटांचे चिरे ढासळले असून महाविकास आघाडीने सर्वत्र जोरदार मुसंडी मारली आहे. विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. मराठवाडय़ात संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेडसह बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली जिल्हय़ांतील एकूण 4134 ग्रामपंचायतींच्या निवडणूक जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी 861 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या. उर्वरित 3273 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान घेण्यात आले होते.

पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला मोठे यश; महाविकास आघाडीच सरस

ग्रामपंचायत निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली असून, कोल्हापूर जिह्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींवर भगवा फडकला आहे. तसेच, सातारा जिह्यातील शंभराहून अधिक ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आल्या. सांगली जिह्यात, सोलापूर जिह्यातील उत्तर भाग, मोहोळ, माढा तालुक्यातही शिवसेनेला यश मिळाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाली असून, भाजपला अनेक ठिकाणी जोरदार झटका बसला आहे.

मतदानाच्या टक्केवारीत यंदाही राज्यात अव्वल राहिलेल्या जिह्यातील 386 ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी लागले. बहुतांश ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून, महाविकास आघाडीलाही यश आले आहे.

मुनगंटीवारांना वंचितचा झटका

बल्लारपूर मतदारसंघातील विसापूर गावात वंचित आघाडीने बाजी मारत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना जोरदार झटका दिला आहे. 17 सदस्यांच्या या ग्रामपंचायतीत वंचित आघाडीने 9 जागांवर विजय मिळवत निर्विवाद बहुमत मिळवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मुनगंटीवार यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

सांगली जिह्यात 30 ग्रामपंचायतींवर भगवा

सांगली जिह्यातील 143 ग्रामपंचायतींपैकी 30 ग्रामपंचायतींवर भगवा फडकवून शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे.
आटपाडी तालुक्यातील 10 पैकी 9, खानापूर तालुक्यातील 11 मधील 9, तासगाव तालुक्यात 5 आणि कवठेमहांकाळमध्ये 11 पैकी 4 ग्रामपंचायतींची सत्ता शिवसेनेच्या ताब्यात आली आहे. खानापूर-आटपाडीतील ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता आली आहे.

सातारा जिह्यात महाविकास, आघाडीला दणदणीत यश

सातारा जिह्यात अटीतटीने झालेल्या 652 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने अपेक्षेप्रमाणे दणदणीत यश मिळवीत वर्चस्व अबाधित राखले. जवळपास 80 ते 85 टक्के ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने विजयाचा झेंडा रोवला आहे. पाटण, महाबळेश्वर-वाई-खंडाळा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने चमकदार कामगिरी केली असून, जिह्यात जवळपास शंभर ग्रामपंचायतींवर भगवा फडकला आहे. कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, तर कराड उत्तरमध्ये पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपापले गड राखले आहेत. दक्षिणमध्ये काही ठिकाणी अतुल भोसले गटाने काही धक्के दिले

नाशिक जिह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा भगवा

नाशिक जिह्यात 565 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेनेने आपले निर्विवाद वर्चस्व राखले आहे. मालेगाव बाह्य, नांदगाव आणि इगतपुरी या तालुक्यात 95 टक्के ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेच्या उमेदवारांनी भविष्यातील गावच्या विकासाचा अजेंडा समोर ठेवल्यामुळे मतदारांनी भरभरून आपला काwल शिवसेनेच्या पारडय़ात टाकला आहे, तर उर्वरित तालुक्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीला संमिश्र यश मिळाले. काही ठिकाणी काँग्रेसनेही विजय संपादन केला आहे. एकंदरित महाविकास आघाडीच्या घोडदौडीने जिह्यात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

बिनविरोध वगळता जिह्यात एकूण 565 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. सायंकाळी साडेचार वाजता मतमोजणी पूर्ण झाली. कृषीमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव बाह्य मतदारसंघातील 60 पैकी 52 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे, अशी माहिती तालुकाप्रमुख संजय दुसाने यांनी दिली. नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघात 90 पैकी 80 ग्रामपंचायतींवर शिवसेनेने निर्विवाद यश संपादन केले. त्यात नांदगाव तालुक्यातील 56 पैकी 50, तर याच मतदारसंघात समाविष्ट असलेल्या मालेगाव बाह्यमधील 34 पैकी 30 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. येवला विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या असून, दुसऱया क्रमांकावर राष्ट्रवादी आहे. बहुतांश ग्रामपंचायतींवर शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीचे सरपंच विराजमान होतील.

राज्यातील एकंदर स्थिती

  • शिवसेना – 3113
  • भाजप – 2632
  • राष्ट्रवादी – 2400
  • काँग्रेस – 1823
  • मनसे – 36
  • स्थानिक – 2344

ठाणे, रायगड, पालघरमध्ये शिवसेनेची दणदणीत सेंच्युरी

सातारा शहरालगत असलेले कोंडवे हे गाव खासदार उदयनराजे भोसले यांनी दत्तक घेतले होते. या ग्रामपंचायतीसाठी उदयनराजे गटाने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र, त्यात ते अपयशी ठरले आहेत. उदयनराजे गटाला 13 पैकी केवळ 3 जागा मिळाल्या असून उदयनराजेंसाठी हा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

नगरमध्ये भाजपचे नेते व माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पॅनलचा लोणी खुर्द गावात दणदणीत पराभव झाला
असून विरोधकांनी 17 पैकी 13 जागा जिंकल्या आहेत. या गावात मागील 20 वर्षांपासून विखेंची सत्ता होती.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा बालेकिल्ला असलेल्या भोकरदन तालुक्यात भाजपला जोरदार हादरा बसलाय. रेणुकाई पिंपळगाव ग्रामपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात गेली आहे.

ग्रामपंचायत

निवडणुकीत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच मूळगाव असणाऱया खानापुरात मोठा धक्का बसलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपला शिवसेनेने झटका दिला आहे. शिवसेनेच्या प्रकाश आबिटकर गटाने 9 पैकी 6 जागा जिंकल्या आहेत. यावर खानापूर म्हणजे महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे.

नाणारचा परिणाम नाही

नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांसह शिवसेनेने विरोध केला आहे. प्रकल्प होणार नाही या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे. अशावेळी विरोधक रिफायनरी प्रकल्प रद्द झालेला असतानाही वारंवार शिवसेनेवर टीका करताना दिसत होते. मात्र राजापूर तालुक्यातील जनता ही शिवसेनेबरोबरच आहे आणि शिवसेनेने जनतेच्या बाजूनेच निर्णय घेतला आहे याची पोचपावती देणारा हा ग्रामपंचायतीचा निकाल होता.

महाविकास आघाडीवर जनतेचा ठाम विश्वास

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीवर राज्यातील जनतेचा अगदी ठामपणे विश्वास असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे अशी प्रतिक्रिया राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील निकालानंतर शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केली.

महाविकास आघाडी जनतेसाठी एकजुटीने काम करीत आहे. कोरोनाच्या साथीला सरकार समर्थपणे सामोरे गेले आणि आजही या साथीशी लढा देत आहे. लोकांच्या आरोग्याची काळजी घेऊन कोणतीही घाईगडबड न करता अत्यंत जबबादारीने आम्ही पुढे जात आहोत. एकेक गोष्ट लोकांसाठी संमयाने खुली करीत आहोत. उद्योग, पर्यावरण अशा सगळय़ाच बाबतीत आपण पुढे जात आहोत. महाराष्ट्र एका चांगल्या हातात असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झालेली आहे. या निकालांमध्ये त्याचे प्रतिबिंब पहायला मिळत आहे. गाव, शहर किंवा कोणत्याही जिह्यात महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या