नागरिकांनी घराबाहेर पडताना स्वयंशिस्त पाळावी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन नागरिकांनी करणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक दिवस नागरिक घरामध्ये होते. परंतू घराबाहेर पडताना स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी केले. आज दापोली उपजिल्हा रुग्णालयाला दिलेल्या भेटीदरम्यान आढावा बैठकीत ते बोलत होते.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, दररोज जनतेशी अधिक प्रमाणात संपर्क असणाऱ्या ठिकाणी काम करणाऱ्या नागरिकांनी आवर्जून कोरोना टेस्ट करुन घ्यावी. मास्कचा वापर करुन सोशल डिस्टन्सिंग पाळावे. जेणेकरुन कोरोनापासून स्वतःचा बचाव होईल व इतरांनाही धोका पोहोचणार नाही.

तसेच राज्यातील रुग्णालयांचा दर्जावाढ करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत दापोली उपजिल्हा रुग्णालयातील प्रसुती तसेच इतर सुविधा मोफत करण्यात येतील. सद्यस्थितीत जिल्ह्यातील नादुरुस्त रुग्णवाहिका निर्लेखीत करण्यात आल्या असून जिल्ह्यात नवीन रुग्णवाहिका लवकरच उपलब्ध करुन देण्यात येतील. शासकीय आरोग्य रुग्णालयातील रिक्त जागांचा प्रश्न सोडवण्यासाठी चक्राकार पध्दतीमध्ये कर्मचारी आणि डॉक्टर यांची नियुक्ती करताना कोकणाला प्राधान्य द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

जिल्ह्यात पाच तालुक्यांच्या केंद्रस्थानी खेड तालुक्यातील कळंबणी येथे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ब्लड बँक सुरु करण्यात येईल. तसेच दापोलीला समुद्रकिनारी अपघात होतात, त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीकोनातून मोबाईल अ‍ॅम्बुलन्स आवश्यक असल्याने ती उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

यावेळी आमदार योगेश कदम, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़.बबीता कमलापुरकर, माजी आमदार संजय कदम, संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या