लॉकडाऊन काळात 6 कोटी 42 लाखांचा दंड वसूल, 79,802 वाहने जप्त – गृहमंत्री अनिल देशमुख

anil-deshmukh

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी 4 लाख 53 हजार 477 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच 5 लाख 60 हजार व्यक्तींना क्वारंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तसेच राज्यात 22 मार्च ते 4 जून या कालावधीत कलम 188 नुसार 1,22,722 गुन्हे नोंद झाले असून 23,827 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी 6 कोटी 42 लाख 83 हजार 211 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 258 घटना घडल्या. त्यात 838 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

राज्यात अवैध वाहतूक करणाऱ्या 1330 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व 79,802 वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील 18 पोलीस व 1 अधिकारी अशा एकूण 19, पुणे 2, सोलापूर शहर 2, नाशिक ग्रामीण 3, ए.टी.एस. 1, मुंबई रेल्वे 1, ठाणे ग्रामीण 2, जळगाव ग्रामीण 1 अशा 31 पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला.

आपली प्रतिक्रिया द्या