पाच दिवस वादळी पावसाचे… घरीच बसा! कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार 

मुंबईसह राज्यभरात पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यामध्ये काही ठिकाणी ताशी 60 किमी वेगाने वारे वाहणार असल्यामुळे वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस कोसळणार असून कोकणातील रायगड, रत्नागिरीसह पुणे, सातारा आणि कोल्हापूरसाठी धोक्याचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मुंबईतही सकाळपर्यंत मुसळधार पाऊस कोसळणार असून दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याने सावधगिरीचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पालिका आणि सरकारकडून करण्यात आले आहे.

मुंबईसह राज्याच्या विविध भागांत गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर वाढला आहे. यामध्ये कोकणातील रत्नागिरीसह राज्याच्या अनेक भागात अतिमुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने कोकणासह गोव्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील पाच दिवस स्थिती कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुण्यासह कोल्हापुरातील घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशीम आणि अकोला जिह्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अरबी समुद्रात चक्रीवादळाचे 150 टक्क्यांनी प्रमाण वाढले!

दरम्यान, अरबी समुद्रात वादळाचे प्रमाण 2001 ते 2019 या कालावधीत तब्बल 52 टक्क्यांनी तर अतितीव्र चक्रीवादळांचे प्रमाण 150 टक्क्यांनी वाढल्याचा निष्कर्ष पुण्याच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजीच्या तज्ञांनी अभ्यासानंतर मांडला आहे. ‘चेंजिंग द स्टेटस ऑफ ट्रॉपिकल सायक्लॉन्स ओव्हर द नॉर्थ इंडियन ओशन’ या शोधनिबंधामध्ये बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरील वेध कालावधी, वारंवारता, वितरण आणि निर्मिती स्थानावरून मांडण्यात आला आहे. जागतिक तापमान वाढ, आर्द्रता वाढीमुळे याचे परिणाम असल्याचेही अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे. या वाढलेल्या वादळांचा मोठा आणि सर्वाधिक फटका किनारपट्टी राज्यांना बसला.

मुंबईला झोडपले

  • मुंबईच्या सर्व भागांत गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम असून आजही पावसाची बॅटिंग सुरूच होती. सकाळी 9.52 मिनिटांनी समुद्राला भरती असल्याने सुमारे 4.12 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. जोरदार पावसामुळे काही भागात पाणी साचले. काही वेळ मध्य आणि हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने  धावत होती.
  • जोरदार पावसामुळे पाच ठिकाणी घरांचा भाग कोसळल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. तर शहारात 4, पूर्व उपनगरात 5 आणि पश्चिम उपनगरात 6 ठिकाणी झाड/फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. शिवाय 6 ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याच्या घटनाही घडल्या. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही.

असा झाला पाऊस

मुंबई शहर – 68.72 मिमी

पूर्व उपनगर – 58.75 मिमी

पश्चिम उपनगर – 58.24 मिमी

किनारी भागाला सतर्कतेचा इशारा

मुंबईत उद्या सकाळपर्यंत अतिमुसळधार पाऊस होणार असल्याने रेड  अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुपारनंतर वादळी पावसाचा जोर वाढणार असल्याने ‘सावधगिरी’चा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार असल्याने मच्छीमारांसह किनारपट्टी क्षेत्रात राहणाऱ्या रहिवाशांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या