महाराष्ट्रात दीड महिन्यात वाढले 10.75 लाख मतदार

215
voting

राज्यात केवळ दीड महिन्यात मतदार यादीत तब्बल 10 लाख 75 हजार नवीन मतदारांचा समावेश झाल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी म्हटले आहे. राज्यात एकूण 8 कोटी 94 लाख 46 हजार मतदार आहेत. एकूण मतदारांपैकी 4.67 कोटी पुरुष आणि 4.27 कोटी महिला मतदार आहेत तर 2,593 तृतीयपंथी मतदार आहेत. दरम्यान, 2 लाख 16 हजार 278 मतदार यादीतून वगळण्यात आले आहेत. मतदारांची संख्या वाढल्याने राज्यात मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आल्याचेही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

ऑक्टोबरमध्ये होणारी विधानसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. अधिकारी आणि कर्मचायांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे बलदेव सिंह यांनी सांगितले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही ईव्हीएम मशीनबरोबर व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे.

पूरग्रस्त भागांत वेळापत्रकानुसारच निवडणूक

राज्यातल्या सांगली-कोल्हापूर या पूरग्रस्त भागांत विधानसभेची निवडणूक निश्चित होणाऱ्या वेळापत्रकानुसारच होईल. त्यात कोणताही बदल होणार नाही. पूरग्रस्त भागातल्या बाधितांना मतदानासाठी नव्याने विनामूल्य ओळखपत्रे देण्याचे काम सुरू आहे. 31 ऑगस्टला मतदार यादी प्रसिद्ध झाली असली तरीही विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन दाखल करण्याच्या 10 दिवस आधीपर्यंत मतदारांना आपली नावे मतदार यादीत नोंदवता येतील, असेही मुख्य निवडणुक अधिकाऱ्यांनी सांगितले. निवडणूक पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली.

  • 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 91,329 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती.
  • यंदा 95,473 मतदान केंद्रे सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
  • 15 जुलैला मतदार यादीत एकूण 8 कोटी 85 लाख 86 हजार 961 मतदारांची नोंद होती. त्यात 4 कोटी 63 लाख 27 हजार 241 पुरुष, 4 कोटी 22 लाख 57 हजार 193 महिला मतदारांचा समावेश होता.
आपली प्रतिक्रिया द्या