सीमाप्रश्नी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई दिल्लीत

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी उद्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या तयारीसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज नवी दिल्लीत दाखल झाले. माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी हे कर्नाटकची बाजू मांडणार असून बोम्मई यांनी त्यांच्याशी तासभर यासंदर्भात चर्चा केली.

सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना बोम्मई मात्र सांगली व सोलापूरवर दावा सांगत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बोम्मईंविरोधात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्राचा दावा कोर्टात टिकणार नाही, असे बोम्मई यांनी आज पत्रकारांना सांगितले. कर्नाटकमध्ये पुढील वर्षी निवडणुका आहेत. त्यामुळेच बोम्मई हा वाद चिघळवत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, एक न्यायाधीश सुट्टीवर गेल्याने उद्याची सुनावणी पुढे ढकलल्याची चर्चा सुरू होती; मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नाही.