
सीमा वादाबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार टीका केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे शिवसेनेचे नाहीतच ते भाजपचेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे ते बाणेदारपणा दाखवत नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
राज्यात घडणाऱ्या विषयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्रीच सर्वकाही बोलत आहेत. असा प्रकार महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही, असे जयंत पाटील म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाबाबत संसदेत बोलत असताना खासदार अमोल कोल्हे यांचा माईक बंद करण्याचे पाप केले. शिवरायांचे नाव जरी घेतले तरी दिल्लीला त्रास होत आहे. भाजपच्या सभापतींनी महाराजांबद्दल बोलताना थांबवले ही गंभीर बाब आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळेल
एकनाथ शिंदेंचे सरकार महाराष्ट्राला एकसंध ठेवण्यातही अपयशी ठरले आहे. त्या भागातील जनतेला या सरकारबद्दल अविश्वास वाटायला लागला आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या मोर्चाला फार मोठा प्रतिसाद मिळणार आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.