… तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ, कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची महाराष्ट्राला पोकळ धमकी

सीमा लढय़ातील हुतात्म्यांना आदरांजली वाहताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच!, असा निर्धार व्यक्त केला. त्यांचा हा निर्धार कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह अन्य नेत्यांना चांगलाच झोंबला आहे. गृहमंत्री बसवराज बोंमई यांनी सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ, अशी पोकळ धमकी देत नव्या वादाला निमंत्रण दिले आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत बंगळुर येथे बोलताना सीमावादावर न्यायालयात आमची बाजू सिद्ध झाली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या राज्याची भूमी सोडणार नाही. तर कन्नड भाषिकांची संख्या जास्त असलेले महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली कर्नाटकात सामाविष्ट करण्याचा प्रयत्न करू, असे बोंमई म्हणाले.

येडियुरप्पा काय म्हणाले?

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकची एक इंचही जमीन कुणाला दिली जाणार नाही, असं स्पष्ट करत कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्याच्या भूमिकेला विरोध केला आहे.

कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच सीमा लढय़ात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचा निर्धार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या