सीमाप्रश्नी केंद्र हस्तक्षेप करणार, महाविकास आघाडीच्या खासदारांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे सीमाभागात मागील काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या गाडय़ांवर ‘कन्नड रक्षण वेदिके’ संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून उघडपणे हल्ले केले जात आहेत. यामुळे सीमाभागातील जनता प्रचंड दहशतीखाली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन या विषयात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. त्यावर गृहमंत्री शहा यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. देशाचे गृहमंत्री नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. सीमाप्रश्नी लवकरात लवकर केंद्र सरकार हस्तक्षेप करेल, असा विश्वास या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

महाराष्टाच्या सीमाभागांत कर्नाटक सरकारची दादागिरी सुरू आहे. ‘कन्नड रक्षण वेदिके’  समितीला पुढे करून सीमाभागांत दहशत माजवली जात आहे. यामुळे सीमाभागातील मराठी जनता मागील काही दिवसांपासून प्रचंड दहशतीखाली आहेत. याबाबत महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेतच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवत न्याय मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना या विषयात संसदेत बोलू दिल नाही. यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसच्या महाराष्ट्रातील खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सीमाभागातील नागरिकांच्या व्यथा मांडल्या. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री सातत्याने महाराष्ट्र तोडण्याची भाषा करत असल्याकडे लक्ष वेधले. या भेटीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्टातील खासदारांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले आणि सीमाप्रश्नी तोडगा काढण्याबाबत आश्वस्त केले.

महाविकास आघाडीच्या खासदारांच्या शिष्टमंडळात शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, राजन विचारे, प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, फौजिया खान, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, काँग्रेसचे खासदार सुरेश धानोरकर, रजनी पाटील यांचा समावेश होता.

10