…अन्यथा मला कर्नाटकात यावे लागेल, ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा उल्लेख करत संभाजीराजे आक्रमक

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर हक्क सांगितल्यानंतर आज मंगळवारी कर्नाटक सीमेवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड केली. याचे महाराष्ट्राच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटले असून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरले आहे. विरोधक आक्रमक झालेला असताना आता संभाजीराजे छत्रपती यांनीही कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.

बेळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये मंगळवारी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. विशेषत: निपाणी जवळील कोगनोळी टोलनाका आणि हिरे बागेवाडी जवळील हिरेबागडी टोलनाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र असे असताना देखील कर्नाटक कन्नड रक्षण वेदिकेचे अध्यक्ष नारायण गौडा आपल्या शेकडो समर्थकासह बेळगावमध्ये आंदोलन करण्यासाठी दाखल झाले. त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणालाही न जुमानता त्यांनी महाराष्ट्रातून आलेल्या गाड्यांवर जोरदार हल्ला चढवला. काही गाड्यांच्या काचा फोडल्या, मार्ग काही काळापासून रोखून धरला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना संभाजीराजे छत्रपती यांनी जशास तसे उत्तर देण्याचा उल्लेख करत आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ट्विट करत संभाजीराजेंनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.

छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापूरातील लाखो भाविक सौंदत्ती येथे आहेत,त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारने करावी अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंना फोन, म्हणाले…