‘तिथून येऊ नकाचा खलिता आला आणि…’, संजय राऊत यांचा मिंधे सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावाद आणखी पेटला आहे. मंगळवारी सकाळी कर्नाटक सीमेवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड केली. यामुळे महाराष्ट्रात संतापाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे सरकारवर हल्ला चढवला.

शिंदे सरकारच्या मंत्र्यांनी आपला 6 डिसेंबरचा नियोजित कर्नाटक दौरा रद्द केला. याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मंत्र्यांचे काय घेऊन बसलात. तिथून त्यांना एक खलिता आला येऊ नका आणि यांची हातभर फाटली. यांनी तिथे धाडसाने, हिंमतीने जायला पाहिजे होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे कर्नाटकच्या सरकारने म्हटले आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, कसला कायदा सांगताय तुम्ही आम्हाला. आमच्या गाड्या फोडल्या, एसटींची तोडफोड केली ते काय लॉ आणि ऑर्डरमध्ये बसते का? तसेच आम्ही यापूर्वीही बेळगावला गेलो आणि यानंतरही जाऊ. बेळगाव-कारवार हा महाराष्ट्राचा, आमच्या बापाचा भाग आहे, असेही राऊत यांनी ठणकावून सांगितले.

हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरचा हल्ला, ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत राज्य सरकारने दाखवावी!