सीमावादावरून रक्तपात होणाची भीती, केंद्रीय गृहमंत्र्यांनी लक्ष घालावे! संजय राऊत यांचे आवाहन

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न तापवून इथे रक्तपात घडवून आणला जाण्याची भीती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी वर्तवली आहे. ही भीती व्यक्त करतानाच त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणात लक्ष घालावे असे आवाहन केले आहे. ही आता केंद्राची जबाबदारी आहे, प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नका असा सल्ला देखील संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले की, ‘आज सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुनावणी होणार आहे. अचानक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यावर आपला दावा सांगितलाय. कर्नाटकातील एका पक्षातील लोकं आमच्या गावात आली आणि त्यांनी तिथे झेंडा फडकावला. काल मला अचानक बेळगाव कोर्टाचे समन्स आले. ही क्रोनोलॉजी तुम्ही समजून घ्या, अचानक हे प्रकरण कर्नाटकच्या बाजूने का तापवलं जात आहे? गृहमंत्र्यांना माझे आवाहन आहे की यात लक्ष घावा नाही तर इथे रक्तपात होण्याची भीती आहे. ही आता केंद्राची जबाबदारी आहे, प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नका.’

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये कन्नड रक्षण वेदिका या संघटनेचा झेंडा फडकावण्यात आला होता. याबाबत प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, तिथली माणसं आपल्या गावात येणं हे कर्नाटक सरकारच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही आणि इथे येऊन आपले झेंडे फडकावतात ते महाराष्ट्र सरकारमधील काही लोकांचा छुपा पाठिंबा असल्याशिवाय होणार नाही. संजय राऊत पुढे म्हणाले की “महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर हे धाडस आतापर्यंत कोणीही केलं नव्हतं. पण एक दुबळं, विकलांग, मानसिकदृष्ट्या अपंग सरकार या राज्यात बसलंय. त्यांना पाठीचा कणा नाही, स्वाभिमान नाही, महाराष्ट्राचा अभिमान नाही अशा सरकारकडून या राज्याचे रक्षण होईल असे वाटत नाही. आमच्या कश्मीरमध्ये येऊन परकीय शक्तींनी झेंड फडकवावेत आणि कश्मीर आमचे आहे असे म्हणावे त्या पद्धतीनेच ही लोकं महाराष्ट्रात घुसली आहे. या सगळ्यांवर राजद्रोहाचे गुन्हे दाखल व्हायला हवेत. “