महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा राजकीय आखाडा , पवार गटानंतर आता तडस गटाकडून स्पर्धेची घोषणा

महाराष्ट्रातील प्रतिष्ठsच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा गेल्या दोन वर्षांपासून राजकीय आखाडा झाला आहे. शरद पवार व बाळासाहेब लांडगे गटाने नोव्हेंबरमध्ये होणाऱया महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यजमानपद धाराशीवला दिले. जुलैमध्ये याबाबतची घोषणा करण्यात आली होती, मात्र आता रामदास तडस व संदीप भोंडवे गटानेही सोमवारी (दि. 25) पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा केली असून ही स्पर्धा लोणीकंद-फुलगाव (पुणे जिल्हा) येथे होणार आहे. ही स्पर्धादेखील नोव्हेंबरमध्येच होणार आहे. दोन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमधील वाद पुन्हा एकदा न्यायालयाच्या दारात जाण्याची शक्यता आहे, मात्र या दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धांमुळे कुस्तीपटूंची मात्र दमछाक होताना दिसतेय. नेमके कुठल्या स्पर्धेत खेळायचे, अशी संभ्रमावस्था महाराष्ट्रातील कुस्तीपटूंची झाली आहे.

तब्बल 54 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर धाराशीवमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार असल्याने तिकडे जय्यत तयारी सुरू होती, मात्र आता आणखी एका महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे पुन्हा एकदा राजकीय आखाडय़ात रूपांतर झाले आहे. धाराशीवची महाराष्ट्र केसरी स्पर्धा शरद पवार अध्यक्ष असलेल्या राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. दुसरीकडे रामदास तडस अध्यक्ष असलेल्या राज्य कुस्तीगीर परिषदेने आज दुसऱया महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. पवार गटाची स्पर्धा ही 65वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा असून, तडस गटाची स्पर्धा ही 66वी स्पर्धा होय. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमधील वादाला आता हास्यजत्रेचे स्वरूप आले आहे. रामदास तडस गटाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ अर्थात 66व्या वरिष्ठ अजिंक्यपद माती-गादी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात रंगणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सोमेश्वर प्रतिष्ठानला मिळाली असून, पुणे जिह्यातील लोणीकंद-फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा होईल, अशी माहिती खासदार रामदास तडस, ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे मुख्य संयोजक व सोमेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक प्रदीप कंद, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विलास कथुरे यांच्यासह पदाधिकारी, कुस्तीगीर उपस्थित होते.

अनधिकृत स्पर्धा घेतल्यास कारवाई करू!

‘आमचीच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अधिकृत आहे,’ असा दावा जुन्या संघटनेचे महासचिव बाळासाहेब लांडगे यांनी दै. ‘सामना’शी बोलताना व्यक्त केला. ते म्हणाले, ‘रामदास तडस गटाने अनधिकृत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केल्यास यावेळी आम्ही नक्कीच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू. उच्च न्यायालयाने आमची संघटना अधिकृत ठरवली आहे, मात्र दुसरी कुस्ती संघटना सत्तेचा दुरुपयोग करून खोटे रेटून नेण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, यावेळी आम्ही त्यांना धोबीपछाड देऊ.’