महाराष्ट्रात हे काय चाललंय? पुणे हादरले… अल्पवयीन  मुलीवर शाळेत अत्याचार

बदलापूर येथे शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुण्यातील भवानी पेठ येथील एका नामांकित शाळेत अल्पयवीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 15 ऑगस्ट रोजी बी. टी. शहानी नवीन हिंद हायस्कूलमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी नराधम आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, या घटनेने पुणे हादरले असून, महाराष्ट्रात हे काय चाललंय? असा प्रश्न जनतेला पडला आहे.

देवराज पदम आग्री (19, रा. स्वारगेट) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिकत असून, आरोपी मुलगा त्याच शाळेतील विद्यार्थी आहे. आरोपी विद्यार्थ्याचे वय 19 असून 15 ऑगस्टला तो शाळेत आला होता. त्यावेळी पीडित मुलगी स्कूल बॅग शोधत असताना त्याने तिला गाठले. तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत विनयभंग केला. या घटनेने खळबळ उडाली आहे.