शिवसेनेच्या भक्कम पाठिंब्यावर भाजपचे प्रसाद लाड विजयी

सामना ऑनलाईन । मुंबई

शिवसेनेच्या भक्कम पाठिंब्याच्या जोरावर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप माने यांचा १३६ मतांनी पराभव केला. आधी व्यक्त करण्यात आल्याप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीची ७ मते फुटल्याची माहिती मिळते.

गुरुवारी सकाळी ९ ते ४ या वेळेत विधान परिषद पोटनिकडणुकीसाठी विधान भवनात मतदान पार पडली. प्रसाद लाड आणि काँग्रेसचे उमेदवार दिलीप माने यांच्यात ही लढत असली तरी संख्याबळ पाहता लाड यांचा विजयाचा मार्ग सुकर असल्याचे स्पष्ट होते. विधानसभेत भाजपचे १२२, शिवसेनेचे ६३, काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादी ४१, शेकाप आणि बहुजन विकास आघाडीचे प्रत्येकी ३ , अपक्ष ७ एमआयएमचे २ तर सपा, रासपा, मनसे आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे आणि भारिपचे प्रत्येकी एक आमदार आहेत. उमेदवाराला जिंकण्यासाठी १४५ मतांचा आकडा पार करावा लागणार होता. लाड यांना शिवसेना, अपक्षांचा पाठिंबा असल्याने तसेच ते पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे असल्याने विरोधकांची मते फोडण्यात त्यांना यश आल्याचे सांगण्यात येते. प्रसाद लाड यांना २०९ तर दिलीप माने यांना ७३ मते मिळाली. दोन मतं बाद ठरली.

आपली प्रतिक्रिया द्या