सरकते जिने कायद्याच्या चौकटीत, अपघात कमी होणार

19

सामना ऑनलाईन । नागपूर

विधानसभेमध्ये आज महाराष्ट्र उद्वाहने, सरकते जिने आणि सरकते मार्ग विधेयक २०१७ला एकमताने मंजूर करण्यात आले. हे विधायक ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले असून महाराष्ट्र उद्वाहन अधिनियम १९३९मध्ये सरकते जिने आणि सरकत्या मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच यात सुरक्षेच्या दृष्टीनेही अनेक तरतूदी करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र उद्वाहन अधिनियम १९३९मध्ये आतापर्यंत कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. उद्वाहन क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक प्रकारचे उद्वाहन सरकते जिने यांचा सर्वात जास्त सार्वजनिक ठिकाणी वापर केला जातो. सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकते जिने आणि सरकते मार्ग यांचे निरिक्षण करण्याची तरतूद करण्यात आली नव्हती, असे बावनकुळे यांनी हे विधेयक सादर करताना सांगितले.

जाणून घेऊयात या विधेयकाची वैशिष्ट्ये –

विधेयकाच्या नवीन मसुद्यात सरकते जिने आणि सरकते मार्ग यांचा प्रथमच समावेश करण्यात आला.

सरकत्या जिन्यांचे आणि मार्गांच्या निरीक्षणामुळे वापर करताना अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

उद्वाहन वापर करताना अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना मदत मिळावी म्हणून त्रयस्थपक्ष विमा संरक्षण बंधनकारक असेल.

उद्वाहनाचे आयुर्मान निश्चित करण्याची तरतूद करण्यात आली.

उभारणी आणि देखभाल करण्यासाठी ठेकेदार, कंपनी किंवा उत्पादकास लायसन्स देण्याची तरतूद

असुरक्षितपणे वापर केल्यास अथवा नियमांचे उल्लंघन केल्यास सील करण्याचे अधिकार, अशा तरतुदी नवीन विधेयकात करण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या