
महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य पुन्हा अधांतरी राहिले आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आजही होऊ शकली नाही. गेल्या चार महिन्यांपासून हे प्रकरण सातत्याने लांबणीवर पडत आहे. त्यामुळे आता पुढची नवी तारीख कुठली मिळते ते पाहावे लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या कामकाजाच्या यादीत हे प्रकरण होते, मात्र आज सुनावणी झाली नाही. आता यावर पुढील तारीख मिळण्याची शक्यता आहे. याआधी 17 जानेवारी ही तारीख देण्यात आली होती. यानंतर याप्रकरणी 7 फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्यात येईल, असे नमूद केले गेले होते. अतिमहत्त्वाच्या प्रकरणांमधील हे प्रकरण असल्याचेही कोर्ट म्हणाले होते, मात्र आज यावर सुनावणी होऊ शकली नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या कामकाजाच्या यादीत हे प्रकरण चौथ्या क्रमांकावर होते, मात्र नंतर याचा क्रम बदलण्यात आला. तसेच 4 वाजता ऐवजी 10 मिनिटे आधीच कोर्टाची कार्यवाही थांबवली गेली. त्यामुळे आजच्या सुनावणीच्या आशा मावळल्या. ही सुनावणी आता उद्या होणार की नवीन तारीख दिली जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.या सुनावणीवर राज्यातील 23 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 207 नगर परिषद निवडणुकांचे भवितव्य
अवलंबून आहे.