सैन्य तैनातीची अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई – गृहमंत्री अनिल देशमुख

1449
anil-deshmukh

काही गुन्हेगार लोकांमध्ये दहशत व असंतोष निर्माण करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट बातम्या किंवा अफवांची एक मोहीम चालवत आहेत. कोरोना महामारी ही देशासमोर व महाराष्ट्राच्या समोरही उभी ठाकलेले एक मोठे सार्वजनिक आरोग्य संकट आहे. या परिस्थितीत मुंबई व महाराष्ट्रातील इतर शहरांवर संपूर्ण संचार बंदी लागू करण्यासाठी सैन्य तैनात होणार अशी अफवा पसरवली जात आहे. या संदेशामध्ये लोकांना या कालावधीत भाजीपाला, किराणा आणि दूध यासारख्या गोष्टी जास्तीत जास्त जमा करण्यास सांगितलं आहे. मात्र ही बनावट बातमी असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

नागरिकांनी अशा संदेशांवर विश्वास ठेवू नये किंवा त्यांना फॉरवर्ड करू नये. यामुळे समाजात उगाचच घबराट पसरते. महाराष्ट्र सरकार कोविड -19 विरुद्ध लढाईस वचनबद्ध आहे आणि या लढ्यातील धोरणात्मक निर्णयाबाबत नागरिकांना वेळोवेळी राज्य सरकार विश्वासात घेत आलं आहे, असे अनिल देशमुख म्हणाले. तसेच अशा अफवा पसरवल्यास आयटी कायदा आणि आयपीसी या दोन्ही तरतुदी प्रमाणे दंड आणि शिक्षा होऊ शकते, अशी ताकीद त्यांनी दिली. महाराष्ट्र सायबर विभाग या मुद्दयाकडे बारकाईने पहात आहे आणि यापूर्वीच त्यांनी अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्र सायबर विभागाच्या चौकशीत असे आढळले आहे की विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील 12 मुख्य यूझर आयडी 8 मे, 2020 पासून आजपर्यंत या अफवा किंवा बनावट बातम्या पसरवत आहेत. अशा हँडल विरुद्ध सीआरपीसी सेक्शन 149 अंतर्गत कायदेशीर चेतावणी देण्याच्या स्वरूपात महा सायबरने यापूर्वीच नोटिसा पाठवल्या आहेत. फेसबुक, ट्विटर इ. सारख्या प्लॅटफॉर्मवर देखील ही पोस्ट काढून घ्या आणि जे ओळखले गेले आहेत अशा लोकांची खाती स्थगित करण्यास सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या