महायुतीचा जनादेश ‘जे ठरले’ त्यालाही आहेच! शिवसेनेची रोखठोक भूमिका

1087

भाजपकडे आमचा एकाच ओळीचा प्रस्ताव आहे, तो म्हणजे ठरल्याप्रमाणे करा. ठरल्याप्रमाणे करायला तयार नसतील तर कोणत्या संवादाची अपेक्षा करता? ‘ठरल्याप्रमाणे करा’ या एका मंत्रावरच महायुती झाली आहे. ‘ठरल्याप्रमाणे करा’ यालाच महायुतीचा जनादेश मिळाला आहे. अडीच वर्षं शिवसेनेचा मुख्यमंत्री, अडीच वर्षं भाजपचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला जनतेसमोर गेला त्यालाच आम्ही गठबंधन आणि युती मानतो, अशी स्पष्ट भूमिका गुरुवारी शिवसेनेकडून मांडण्यात आली.

‘मातोश्री’ निवासस्थानी पार पडलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी याविषयीची माहिती ‘दै. सामना’ कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिली. संजय राऊत म्हणाले, महायुतीला जनादेश मिळाला आहे. तो केवळ महायुतीला नाही.

महायुती जेव्हा होत होती तेव्हा जनतेसमोर ज्या बाबी ठरवण्यात आल्या त्याला हा जनादेश मिळाला आहे. ज्या गोष्टी ठरतात त्यावर मतदार एकत्र येऊन मतदान करतात, जे ठरलंय त्याला हा जनादेश आहे हेच हे लोक विसरतात.

उद्धव ठाकरे यांचा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा

राज्याचं नेतृत्व शिवसेनाच करेल, ही भूमिका उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बैठकीत ठामपणे मांडली. शिवसेनेच्या भूमिकेत बदल झालेला नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातील सर्व आमदारांनी एकमुखाने उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. ते जो निर्णय महाराष्ट्राच्या हितासाठी घेतील तो आम्हाला मान्य आहे. त्यानुसार आम्ही पुढे जाऊ, असा विश्वास सर्व आमदारांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे, असे खासदार राऊत यांनी सांगितले.

भाजप सरकार का स्थापन करीत नाही?

महाराष्ट्राचा जनादेश महायुतीला असल्याचं भाजपकडून सांगितलं जात आहे. जर महायुतीला जनादेश मिळाला तर सरकार स्थापनेचा दावा का नाही करीत? भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. तुमचा मुख्यमंत्री होणार बोलता, मग राज्यपालांना भेटून रिकाम्या हातांनी का परतलात, असा सवाल त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, 8 तारखेपर्यंत विधानसभेची मुदत आहे. त्यापूर्वी नवीन सरकार स्थापन व्हायला हवं. मात्र सर्वात मोठा पक्ष असूनही भाजप सरकार स्थापन करू शकत नाही याचा अर्थ त्यांच्याकडे बहुमत नाही. महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवट लादू पाहत आहे, हा जनतेचा अपमान आहे. आम्ही सरकार बनवू शकत नाही, विरोधात बसायला आम्ही तयार आहात हे तुम्ही जनतेला सांगा. आम्हीही सरकार बनवणार नाही आणि दुसऱया कुणीही सरकार बनवू नये हे संविधानाच्या विरोधात आहे. हा खेळ जुना झाला. हा खेळ अधिक चालणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

नरेंद्र मोदी, अमित शहा शिवसेनेत प्रवेश करणार का?

सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे भाऊ असल्याचं सांगितल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता संजय राऊत म्हणाले, गोड बातमी त्यांच्याकडे असते. ते किती नाती जन्माला घालतात आणि लाडवाचं जेवण घालतात ते मला माहीत नाही. देवेंद्र फडणवीस मी शिवसैनिक आहे असे म्हणतात असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, मोदी आणि अमित शहा यांना शिवसेनेत प्रवेश करा सांगितलं तर ते प्रवेश करणार आहेत का? अशा प्रकारच्या, उपमा आणि अलंकार वापरून राजकारण होत नाही. शिवसैनिक हा शब्दाला जागतो, शिवसैनिक खोटं बोलत नाही, तो वचनाला जागतो. सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी खंजीर खुपसत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेना आमदार रंगशारदावर

‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर शिवसेना आमदार वांद्रे येथील रंगशारदावर दाखल झाले. यावर शिवसेनेची भूमिका मांडताना संजय राऊत म्हणाले, नव्याने निवडून आलेल्या आमदारांची मुंबईत निवासस्थानाची व्यवस्था झालेली नाही. मनोरा आमदार निवासही पाडण्यात आले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणे ही पक्षाची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या स्थितीत सर्व आमदारांनी एकत्र असणं आवश्यक आहे. एकत्र निर्णय घेण्याची आवश्यकता भासल्यास अशावेळी सर्व एका ठिकाणी असायला हवे यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

सरकारला ताकद शिवसेनेचा मुख्यमंत्री देईल

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ज्या घडामोडी घडत आहेत, त्यामुळे अस्थिरता निर्माण झाली आहे. ती ज्यांनी निर्माण केली आहे ते महाराष्ट्राचं नुकसान करीत आहेत. या राज्याला लवकरात लवकर एक सरकार मिळावं. त्या सरकारला ताकद देण्याचं काम शिवसेनेचा मुख्यमंत्री करेल ही आमची भूमिका आहे. महाराष्ट्राच्या निवडून आलेल्या जवळजवळ सर्वच पक्षांच्या आमदारांनी, प्रमुख नेत्यांनी यापुढे राज्याचं नेतृत्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करेल ही भावना मांडल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या