राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र नंबर १

67

सामना ऑनलाईन, धाराशिव

२७ व्या फेडरेशन चषक राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महिला आणि पुरूषांचा महाराष्ट्र संघ अव्वल ठरला आहे. महिलांनी कर्नाटकच्या संघाला पराभूत केलं तर पुरूषाच्या संघाने कोल्हापूरला पराभूत करत राष्ट्रीय अजिंक्यपद चषकावर आपले नाव कोरले. काळजाचा ठोका चुकविणार्‍या अटीतटीच्या लढतींमध्ये महिला आणि पुरूषांच्या महाराष्ट्र संघाने आपले वर्चस्व सिध्द केले आहे.

तुळजाभवानी क्रीडा संकुलात प्रबोधनकार ठाकरे क्रीडानगरीत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानच्यावतीने २७ व्या फेडरेशन चषक राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात अकरा राज्यातील सोळा संघांनी सहभाग घेतला होता. शुक्रवारी सकाळी उपांत्य सामने झाले. तर सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत अंतिम सामना झाला.

महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या महिला संघाने तीन गुणांच्या फरकाने कर्नाटकला धूळ चारली. महाराष्ट्राच्या प्रियंका भोपी, ऐश्‍वर्या सावंत यांनी केलेला संरक्षणात्मक खेळ अनेकांना भावला. श्रृती सपकाळने एक, काजल भोरने चार तर मृणाल कांबळेने तीन गडी बाद करून महाराष्ट्राला अकरा गुण मिळवून दिले. कर्नाटकाकडून एकमेव विना एम.ने डाव धरून ठेवण्याचा प्रयत्न केला. दीक्षाने एक आणि संगीताने एक गडी बाद करून संघाला चांगल्या लढतीत आणले. मात्र अखेरीस महाराष्ट्राच्या प्रबळ संघाने कर्नाटकाचा तीन गुणांनी मात करीत अंतिम सामन्यावर आपले नाव कोरले.

kho-kho-men

महाराष्ट्र विरूध्द कोल्हापूर या पुरूषांच्या संघात शेवटच्या डावापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्याला उपस्थित हजारो क्रीडारसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. महाराष्ट्राने कोल्हापूरच्या संघावर पाच गुणांनी मात करीत राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. महाराष्ट्राच्या महेश शिंदे, अक्षय गणपुले आणि दिपेश मोरे यांच्या कौशल्याला क्रीडा रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोल्हापूरच्या सागर पोतदार, विजय हजारे आणि सुशील चव्हाण यांचा खेळ देखील खो-खोप्रेमींच्या पसंतीस उतरला. महाराष्ट्राने या सामन्यात पंधरा गुण केले होते. त्याचा पाठलाग करताना कोल्हापूरला दहा गुणांवरच समाधान मानावे लागले.

विजयी संघांना सिने अभिनेते विजय कदम, रेशीम टिपणीस, स्पर्धेचे आयोजक अनिल खोचरे, आमदार ज्ञानराज चौगुले, भारतीय खो-खो महासंघाचे सुरेश शर्मा, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे डॉ. चंद्रजित जाधव यांच्या हस्ते पारितोषिक देवून सन्मानीत करण्यात आले. या स्पर्धेत उत्कृष्ट संरक्षक क्रीडापटूंचा पुरस्कार कोल्हापूरच्या सागर पोतदारला आक्रमक क्रीडापटूचा पुरस्कार, महाराष्ट्राच्या दिपेश मोरेला तर अष्टपैलू क्रीडापटूचा सन्मान महाराष्ट्राच्या महेश शिंदे यांना देण्यात आला. महिला संघातून सर्वोत्कृष्ट क्रीडापटूचा बहुमान महाराष्ट्रच्या प्रियंका भोपी, उत्कृष्ट संरक्षक क्रीडापटूचा सन्मान कर्नाटकच्या विना एम. यांना तर आक्रमक क्रीडापटू म्हणून महाराष्ट्रच्या काजल भोर हिला मान्यवरांच्या हस्ते चषक आणि मेडल देवून सन्मानीत करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या