कोरोना संकटात पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी उपाययोजनात मारली राज्यात बाजी

1150

>> विजय जोशी

कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात राज्यभरात राज्य पोलीस महासंचालकांनी केलेल्या मार्गदर्शक सूचना व उपाययोजना संदर्भात नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सर्वच उपक्रमात पहिला क्रमांक पटकावून त्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याने राज्यात सबसे हटके काम करुन एक वेगळे वलय निर्माण करुन बाजी मारली आहे. ज्यात संजीवनी दुत व्हॅन, जीवन बिंदू कक्ष, मोटारसायकल व ड्रोन पेट्रोलिंग, थर्मामीटर मशिन, सॅनिटायझरचे वाटप, हेल्पलाईन व फेस मास्कचे वाटप संबंध जिल्ह्यात पोलीस यंत्रणेला केल्याने त्यांचे राज्यभरात कौतूक होत आहे.

लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्हा पोलीस दलासाठी, पोलीस दलातील कर्मचारी, अधिकारी वर्गासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या. राज्याचे पोलीस महासंचालक तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा तंतोतंत वापर करुन राज्यात सर्व प्रथम हे उपक्रम राबविण्याचा मान त्यांनी मिळविला.

लॉकडाऊनच्या काळात करण्यात आलेली शहरातील वेगवेगळ्या भागातील नागमोडी बॅरीकेटींग ही वैशिष्ट्यपूर्ण ठरली. ठिकठिकाणी नेमलेले वाहतूक कर्मचारी, त्यांच्याकडून होणारी गाड्यांची तपासणी, मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी जनतेमध्ये केलेली जागृती ही वैशिष्ट्यपूर्ण ठरली. तीन राज्याच्या सिमेवर वसलेला हा जिल्हा त्यामुळे बाहेर राज्यातून येणाऱ्या मंडळींना आवरण्यासाठी त्यांची तपासणी करण्यासाठी भोकर-म्हैसा मार्गावर उभारण्यात आलेली, तेलंगणा सिमेवर देगलूर व बिलोली तालुक्यात उभारलेली राज्य चौकी यामुळे परराज्यातून येणाऱ्या अनेक अवैध प्रवाशांवर तसेच कोरोनाग्रस्त नागरिकांच्या तपासणीमुळे त्यांचा महाराष्ट्रातील प्रवेश होऊ शकला नाही. कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यातून येणारे असंख्य नागरिक यामुळे नांदेड जिल्ह्यात येऊ शकले नाही.

सर्वसामान्य नागरिकांसाठी व अत्यावश्यक सुविधांसाठी व गरज पडेल तर दूरध्वनीसाठी नवीन हेल्पलाईन क्रमांक व ई-मेल देखील कार्यान्वित करण्यात आले. ज्यामुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणी, त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, बाहेरगावाहून येण्यासाठी ई-पासची सुविधा कशा पध्दतीने मिळू शकेल याबाबतची सविस्तर माहिती देण्यासाठी दूरध्वनी क्रमांक व त्यांच्या विस्तारीत लाईन उपलब्ध करुन देण्यात आल्या. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीसाठी व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. चुकीच्या पध्दतीने कागदपत्रे असताना अडवणूक होत असेल तर त्यासाठी पोलीस अधीक्षकांचा थेट क्रमांक यासाठी देण्यात आला. या हेल्पलाईनसाठी स्वतंत्र संगणक कक्ष, दूरध्वनी क्रमांक व मनुष्यबळाचा वापर करण्यात आला. याचा हजारो नागरिकांनी फायदा घेतला.

nd-advt-photo-5

पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी फेस मास्क मोफत पुरविण्यात आले. सामाजिक संस्थांची मदत घेत असताना यासाठी हे त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोना विषाणूचा संसर्ग कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सर्व कक्षामध्ये सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्यात आले. सचखंड गुरुव्दारा बोर्डाने पुरविलेले सॅनिटायझर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात वेळेवर पोहंचले. पोलीस दलाने देखील किटकनाशक फवारणी पंप विकत घेवून ठाण्यांचा परिसर तसेच गजबजलेला परिसर या भागात फवारणी करण्यासाठी कर्मचारी मागेपुढे पाहिले नाही. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना चष्मा आणि मास्कचे वाटप करत असताना कार्यालयाच्या दैनंदिन सफाईसाठी सॅनिटायझर, हॅन्डवॉश, बकीट, वेगवेगळ्या प्रकारचे झाडू, डस्टबिन, रुमाल अशा अनेक वस्तू पोलीस दलातर्फे विकत घेवून त्या सर्व पोलीस ठाण्यांना पुरविण्यात आल्या. लॉकडाऊनच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना चहा, नाष्टा व जेवणे पुरविण्यात आले. यावर स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर नियंत्रण ठेवून होते.

यमराजांची संकल्पना

वजिराबाद चौकात साक्षात यमराजाच्या रुपात जनतेला जागृती करण्यासाठी यमराजाचा वेश घालून धिप्पाड असा कलावंत उभा करण्यात आला. विनाकारण घराबाहेर निघाल्यानंतर रस्त्यावर कोरोनारुप यमराज तुमची वाट बघत आहे, बाहेर पडू नका, अन्यथा कोरोनारुपी यमराजाच्या भक्ष्यस्थानी सापडाल असा संदेश देणारे पथनाट्य त्यांनी उभे केल्याने लोकांना जनजागृती होवून विनाकारण बाहेर पडणाऱ्या ची संख्या कमी झाली. जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांचे याबाबत मार्गदर्शन होतेच. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व फेस मास्कचे वाटप करण्यात आले.

संजीवन दुत व्हॅन व जीवन बिंदू कक्ष

विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनानुसार त्यांच्याच हस्ते संजीवनद दुत व्हॅन तयार करण्यात आली. ज्यात निर्जंतुकीकरण उपकरणे बसविण्यात आली होती. सर्वसामान्य नागरिक व पोलीस कर्मचाऱ्यांनी या व्हॅनचा वापर करुन डोक्यापासून ते पायापर्यंत जंतूनाशक द्रव्यांच्या साह्याने निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेश व्दारावर जीवन बिंदू कक्ष स्थापन करण्यात आला. प्रत्येक येणारा कर्मचारी व अधिकारी या जीवन बिंदू कक्षातून निर्जंतुकीकरण होवूनच पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रवेश करेल, अशा पध्दतीचे नियोजन करण्यात आले. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला सॅनिटायझरचा वापर करण्याबाबतचा सल्ला देवून त्यांच्या हातावर व सोबत आणलेल्या सामानावर सॅनिटायझरही फवारण्यात आली. संजीवनी दुत व्हॅन व जीवन बिंदू कक्ष सुरु करणारे महाराष्ट्रातील नांदेड हे पहिलेच पोलीस अधीक्षक कार्यालय ठरले. पोलीस कुटुंबियांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देत असताना त्यांच्यावर कोरोना विषाणूचे संक्रमण होवू नये यासाठी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षकांनी प्रबोधन केले. पोलीस कॉलनीमध्ये जावून याबद्दल अनेकवेळा त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या समवेत अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, दत्ताराम राठोड, उपअधीक्षक डॉ.धुमाळ, अभिजित फस्के, धनंजय पाटील, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर, शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रमुख सोबतच जनसंपर्क अधिकारी रामेश्वर कायंदे यांनी पोलीस अधीक्षकासमवेत हे प्रबोधन केले.

कोविड मोटारसायकल व ड्रोन पेट्रोलिंग

nd-advt-photo-4

नांदेड शहराच्या ज्या भागात कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे त्यांना अलर्ट करण्यासाठी जवळपास वीस कोविड मोटारसायकली उपलब्ध करुन देण्यात आल्या. यावरुन पोलिसांचा संदेश, घराबाहेर पडू नका, अशा सूचना सायरनचा आवाज आणि ध्वनीक्षेपक याचा वापर करत पोलिसांचे हे दुत कंटेनमेंट झोनमध्ये फिरत होते.

कोविड मोटारसायकल पेट्रोलिंगच्या मोटारसायकली तयार करण्यासाठी पोलीस निरीक्षक मंगेश पाटील यांनी परिश्रम घेतले. प्रायोगिक तत्वावर अशा 32 मोटारसायकली शहरात फिरविण्यात आल्या. ज्यामुळे या कंटेनमेंट झोनमध्ये विनाकारण फिरणाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आळा बसला. लॉकडाऊनच्या काळात पहिले ड्रोन फिरले ते महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात. सदर ड्रोनमध्ये पी.ए.सिस्टीम, अत्याधुनिक कॅमेरा, विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांचे व्हिडीओ चित्रीकरण याची माहिती घेण्यात आली. त्यानुसार कलम 144 व कलम 188 नुसार संबंधितांवर गुन्हे नोंदविण्यात आले.

राज्यात मुंबई वगळता सर्वाधिक गुन्हे याबाबत नोंदविण्याचा विक्रमही याच जिल्ह्याने केला

nd-advt-photo-7

नांदेड जिल्ह्याच्या सभोवताली असलेल्या दहा आंतरजिल्हा चेकपोस्ट व पंधरा आंतरराज्य सीमा बंद करण्यात आल्या. यासाठी 24 तास पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. याठिकाणी थर्मामीटर मशिनचा वापर करुन लोकांची तपासणी करण्यात आली. प्रवेशीत होणारा प्रत्येक व्यक्ती आपले कागदपत्र पूर्ण करुन आपल्या राज्यात येत आहे का, याची खातरजमाही करण्यात आली.

वरिष्ठांचे सहकार्य, मार्गदर्शन तसेच जनतेने दिलेला सकारात्मक प्रतिसाद महत्वाचा-पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर शहरात नागमोडी वळणाचे लावलेले बॅरीकेटींग, ठिकठिकाणी लावलेला पोलीस बंदोबस्त, नागरिकांना सुरक्षेबाबत केलेले आवाहन, अनलॉकडाऊनमध्ये पाळावयाच्या नियमांची संहिता याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद हे या यशाचे प्रतिक आहे, अशा भावना जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी व्यक्त केल्या. सर्वसामान्य जनतेत कोरोनाबद्दल जागृती तसेच या विषाणू संसर्गामुळे निर्माण होणारे धोके, त्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत प्रसंगी कठोर होवून देखील आम्ही कारवाई केली आहे. नांदेड जिल्ह्यातील जनतेने आमच्या सर्व उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद दिला. येणाऱ्या काळात देखील या जनजागृतीबाबत आम्ही याच पध्दतीने सतर्वâ राहणार आहोत. सोशल डिस्टनसिंग, सॅनिटायझरचा वापर आणि मास्क या तीन सूत्रांचा अवलंब जनतेने चांगल्या पध्दतीने करावा यासाठी आमचे पोलीस दुत सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सतर्क आहेत व यापुढेही राहतील. कोरोना विषाणू संसर्गावर अद्यापही लस निघाली नसल्याने या तीन सूत्रांचा काटेकोरपणे वापर व्हावा, यासाठी आमची धडपड चालू असून, जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीचा हा यज्ञ यापुढेही चालूच राहील. वेगवेगळ्या कोविड केअर सेंटरवर येणाऱ्या अडचणी, रुग्णांच्या संदर्भात होणारी विचारपूस तसेच याठिकाणी असलेल्या व्यवस्था व बंदोबस्ताबाबत नेहमीच नांदेड पोलीस सतर्वâ राहिली आहे. वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी आमच्या अनेक उपक्रमांना साथ दिली, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने यासाठी निधीही उपलब्ध करुन दिल्याने आम्ही या यंत्रणा त्वरेने आणि प्रभावीपणे राबवू शकलो. जनतेचे सहकार्य यापुढेही मिळाले पाहिजे, रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी आता बंदोबस्त लावण्याची गरज आहे. जनतेने देखील सतर्कता बाळगून आम्हाला आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले.

लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेचा चांगला प्रतिसाद, टिम पोलिसांचेही अभिनंदन-विजयकुमार मगर

nd-advt-photo-10

लॉकडाऊनच्या काळात नागमोडी बॅरीकेटींगच्या माध्यमातून केलेली बांधणी व नियोजन याला सर्वसामान्य जनतेने दिलेला प्रतिसाद आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेली साथ यामुळे समाधानी असून, सर्व टिमचे मी अभिनंदन करतो, अशा भावना जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सामनाशी बोलताना व्यक्त केल्या.

मार्च महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत लॉकडाऊनचा काळ होता. या काळात केलेले नियोजन, जिल्हा प्रशासनाने दिलेली साथ, पोलिसांच्या टिमने दिलेल्या सूचनांचे केलेले पालन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वसामान्य जनतेने आम्हाला दिलेला प्रतिसाद हा खूप महत्वाचा आहे. नागमोडी वळणाच्या बॅरीकेटींगमुळे शहरातील वेगवेगळ्या भागात दिलेला बंदोबस्त आणि ठिकठिकाणी दिलेले चेकींग पोस्ट यामुळे या काळात चांगल्या पध्दतीने नियोजन होऊ शकले. अवैधरित्या व विनाकारण फिरणाऱ्या लोकांना यामुळे चाप बसला. या काळात शहराच्या दोन्ही वाहतूक शाखेने केलेले काम चांगल्या पध्दतीने होऊ शकले. राज्यामधील एकमेव नांदेड जिल्हा असा आहे, जेथे दंडाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळू शकला. जवळपास आठशेहून अधिक गुन्हे हे 144 व 188 कलमाखाली दाखल झालेले आहेत. अत्यावश्यक व्यवस्थांना यातून सूट देण्यात आली होती. त्यामुळे जी अन्य मंडळी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर होती त्यांच्या कडक निर्बंध लावण्यात आले. बाहेरुन आलेल्या सर्व प्रवाशांना महानगरपालिकेच्या माध्यमातून घरीच क्वारंटाईन करण्यात आले. यावर देखील आमची नजर होतीच. पहिला रुग्ण सापडल्यानंतर आणखी आम्ही सतर्क झालो, आणि हे निर्बंध आणखीनच कडक होत गेले. मात्र याला सकारात्मक प्रतिसाद मिळत गेला. अनावश्यक गर्दी टाळणे, विनाकारण बाहेर फिरणे यासाठी सुरुवातीच्या काळात प्रबोधन केले आणि त्यानंतर गुन्हेही दाखल केले. जनजागृतीच्या माध्यमातून लॉऊस्पीकरव्दारे सर्वसामान्य जनतेला सूचना देणे, काळजी घेण्याबाबत आवाहन करणे व प्रसंगी कडक कारवाई करणे, या त्रिसूत्रीमुळे आपल्याकडील सबंध जिल्ह्यातील लॉकडाऊन नियोजनबध्द पध्दतीने यशस्वी होऊ शकला. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, आरोग्य सेवेतील अधिकारी, त्यांचे कर्मचारी यांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे या सर्व चांगल्या गोष्टी होत गेल्या. पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन केल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या कमी ठेवण्यात सर्वच टिमला यश आले. काही ठिकाणी जनतेचा रोषही पत्करावा लागला. लोक किती दिवस घरात बसतील हाही विचार होता,मात्र कोरोना विषाणूचे संकट हे भयावह असल्याने त्यांना समजावून सांगण्याशिवाय पर्याय नव्हता. अनेकांनी समजूतदारपणाही घेतला, ज्यांनी ऐकले नाही त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये त्याचप्रमाणे कोविड केअर सेंटर परिसरात केलेली सुरक्षा व्यवस्था ही प्रशंसनीय होती. गुरुव्दारा, लंगर साहिब, महापालिका, परिवहन विभाग, आरोग्य विभाग यांची समन्वयाची कडी एकत्र करुन आपल्या जिल्ह्यात लॉकडाऊन यशस्वी झाला. गुरुव्दारा आणि लंगर साहिबने दररोज दहा ते पंधरा हजार लोकांचे जेवण त्यांच्या घरापर्यंत पोहंचविले हे देखील अभिमानाचीच बाब आहे. बंदोबस्ताला असलेल्या कर्मचाऱ्यांनाही वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी केलेली मदत आम्ही विसरणार नाही. नांदेडकर जनतेच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आम्ही यशस्वी गेलो. आता रुग्ण वाढत असल्याने अनलॉकडाऊनच्या काळात सर्वांनीच सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. आणि सर्वसामान्य जनतेचा तो आता नियमच बनला आहे. मास्क घालून फिरणे, स्वतःची काळजी घेणे, गर्दीपासून दूर राहणे, या सवयी आता लोकांना लागल्या आहेत. भर उन्हाळ्यात रस्त्यावर सेवा बजाविणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची मी नेहमीच कौतूक केले आहे. त्यांच्यासोबत अनेकदा संवाद साधता आला, बोलता आला, केलेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अनेकांना समजही देण्यात आली. त्याचेही पालन सर्वांकडून झाले. हे समाधानाची बाब आहे. जगभरात पसरलेला हा कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात येण्यासाठी आता सर्वांच्या सहकार्याची गरज आहे आणि हा लढा आपण जिंकूच, असा विश्वास विजयकुमार मगर यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या