धक्कादायक! नाशिकच्या अनाथाश्रमात 4 वर्षीय बालकाची हत्या

नाशिकच्या त्र्यंबक येथील अनाथाश्रमात 4 वर्षीय बालकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अलोक शिंगारे असे या मृत बालकाचे नाव असून तो उल्हासनगर येथील रहिवासी होता. नाशिकचे ‘आधारतीर्थ’ हे अनाथाश्रम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले तसेच गरीब कुटुंबातील मुलांसाठी ओळखले जाते. मात्र याच आधारतीर्थ आश्रमात 4 वर्षीय बालकाचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अनाथाश्रमात सध्या 1.5 ते 17 वर्षे वयोगटातील 72 मुले आणि 36 मुली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आधारतीर्थ आश्रमात सकाळी 6 च्या सुमारास ट्रॅक्टरच्या बाजूला अलोक मृतावस्थेत आढळून आला. आश्रमातील अशोक पाटील यांनी संस्थेच्या वाहनातून त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. मात्र शवविच्छेदन अहवालात या मुलाची गळा आवळून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. आश्रमात अलोक कुणासोबत राहत होता. तसेच त्याच्या कुटुंबियांची माहिती पोलिसांनी घेतली आहे. या आश्रमात यापूर्वी मुलांचा छळ होत असल्याबाबत अनेक तक्रारी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेची माहिती मिळताच आलोकची आई सुजाता शिंगारे उल्हासनगरहून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, चार महिन्यांपूर्वी मी आलोकला अनाथाश्रमात सोडले होते. मी त्याच्याशी दरवेळी फोनवरून संपर्कात होती. माझा मोठा मुलगा (11) देखील त्याच अनाथाश्रमात आहे.

दरम्यान आलोकचे सायंकाळी आश्रमातील मुलांसोबत भांडण झाले होते. त्यातून तर हा प्रकार झाला नाही ना याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. आश्रमातील मुलांचे समुपदेशन करण्यासाठी मानसोपचार तज्ञांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मध्यरात्री ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.