महाराष्ट्रावर नैसर्गिक संकट! दीड हजार कोटी द्या!! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

2070

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे राज्यात 1 हजार 65 कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले तर सहा दिवसांपूर्वी वादळासह झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राला त्वरित मदत जाहीर करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. संकटाशी मुकाबला करतांना केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि आसाम या सहा राज्यांत अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव संजय पुमार, सचिव आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन किशोरराजे निंबाळकर सहभागी झाले होते.

राष्ट्रीय पातळीवर समितीची मागणी

महाराष्ट्राला बसलेला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा व 5 ऑगस्टला मुंबईत झालेल्या अतिवृष्टीची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिली. नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी व सर्व राज्यांमध्ये समन्वय साधण्याकरिता राष्ट्रीयस्तरावर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करावी अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी केली. इंटर स्टेट फ।ड मॅनेजमेंट सिस्टिम उपयुक्त असली तरी त्यामध्ये केंद्र शासनाचे प्रतिनिधी असावेत अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

संभाजीनगरसाठी डॉपलर रडारची मागणी

मराठवाड्यातील हवामान अंदाजासाठी संभाजीनगरला स्वतंत्र तीन डॉपलर रडार उभारणीची मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

राष्ट्रीय स्तरावर धोरण

नदी जोड प्रकल्प, रिअर टाईम डाटा साठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर, नदी किनारी होणारी अतिक्रमणे, फ।ड डॅम्स उभारणे, पुरग्रस्त भागातील पाणी दुसऱया खोऱयात नेणे अशा महत्वाच्या विविध विषयांवर राष्ट्रीय स्तरावर धोरण निश्चित करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनांवर निर्णय घ्या

आपत्कालीन परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणेमध्ये चांगला समन्वय असून संकटाशी मुकाबला करतांना केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले तसेच बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या सूचना आणि योजनांवर संबंधित केंद्रीय विभागाने विचार करून निर्णय घेण्याचे आदेशही पंतप्रधान मोदी यांनी दिले.

विकासासाठी सोपे मार्ग नको

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा अकोला-खांडवा मीटरगेज मार्ग ब्रॉडगेज करताना तो व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरून पर्यायी मार्गातून नेल्यास जंगलाचे रक्षण तर होईलच परंतु मानवी वस्तीलाही रेल्वेसेवेचा फायदा होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. विकासासाठी सोपे मार्ग निवडल्यास प्रश्न अधिक जटील होतील याकडे सर्वांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी पश्चिम घाटातील जैवविविधतेसाठी महाराष्ट्र नेहमीच पुढाकार घेईल हेही यावेळी सांगितले.

माहूल पंपिंग स्टेशनसाठी जागा

केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाची जागा मुंबई पालिकेला हस्तांतरीत केल्यास माहुल पंपिंग स्टेशनच्या उभारणीच्या कामाला गती येईल. हे पंपिंग स्टेशन उभे राहिल्यास हिंदमाता, दादर, वडाळा या भागातील पावसाचे मोठय़ा प्रमाणात साचणारे पाणी बाहेर काढणे शक्य होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या