स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता हे देणारे आपले संविधान आहे. आपल्याला संविधानामुळेच सुरक्षिततेची जाणीव होते. देशातील नागरिकांच्या मुलभूत हक्क आणि अधिकारांसाठी महत्त्वाच्या असलेल्या संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे. संविधान वाचविण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. आता देशातील जनतेने संविधान वाचवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलनचे संस्थापक, अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी केले आहे. यवतमाळच्या उमेरखेड येथे ‘संविधान बचाव महाराष्ट्र बचाव’ या विषयावर ते बोलत होते.
प्रा. श्याम मानव यांनी सध्या सुरू असलेल्या देशाच्या व राज्याच्या अनागोंदी कारभारावर सडकून टीका केली. सरकारने चालविलेल्या हुकूमशाही कारभाराला रोखण्यासाठी जनतेने पुढे येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. जातीय सलोखा बिघडविण्याचे व अंधश्रद्धा, बुवाबाजीला खतपाणी घालण्याचे काम सत्ताधारी सत्ता टिकविण्यासाठी करत आहे, असा आरोपही मानव यांनी केला.
सरकारी कंपन्या बड्या उद्योगपतींना विकून देश कंगाल करण्याचे काम होत आहे. संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारच्या शोतकरीविरोधी धोरणांमुळे देशात शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान जनतेच्या हिताचे आणि हक्कांचे रक्षण करणारे आहे.मात्र, यावरून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही मानव यांनी सांगितले.