पुनर्विकास रखडलेल्या धोकादायक इमारती म्हाडा ताब्यात घेणार

80

सामना प्रतिनिधी । मुंबई

इमारती मोडकळीस आल्यानंतरही त्याची दुरुस्ती तसेच पुनर्विकासाबाबत मालकांकडून कोणतीही पावले उचलली जात नाहीत. यामुळे डोंगरीतील केसरबाई इमारतीप्रमाणे दुर्घटनाग्रस्त होण्याची वेळ अन्य इमारतींवर येऊ नये यासाठी सरकार लवकरच कायदा करणार आहे. मालकाकडून पुनर्विकास रखडलेल्या या इमारती म्हाडा ताब्यात घेऊन त्यावर विकासक नेमणार आहे. या इमारतींचा पुनर्विकास झाल्यानंतर मालकाला रेडिरेकनरच्या 15 टक्के रक्कम दिली जाणार आहे. यासंदर्भात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून याविषयीची अधिसूचना लवकरच निघणार आहे.

मुंबईत असलेल्या सेस तसेच नॉन सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कधी विकासकाकडून, कधी इमारतींच्या मालकांकडून तर कधी भाडेकरूंकडून विकास रखडवला जातो. हे रोखून या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडा पावले उचलणार असल्याची माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत चर्चा झाली. पुनर्विकास रखडलेल्या इमारतींच्या मालक तसेच विकासकांना म्हाडाकडून नोटीस पाठविण्यात येणार आहे. या नोटीसीवर सहा महिन्यांत कार्यवाही करावी लागणार आहे. त्यानंतरही मालकाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्यास ही इमारत ताब्यात घेण्याची तसेच रिकामी करण्याची कारवाई म्हाडाकडून करण्यात येणार आहे. 51 टक्के रहिवाशांची संमती घेऊन तीन महिन्यांत या इमारतीच्या पुनर्विकासासाठी म्हाडाकडून विकासक नेमण्यात येईल. इमारतीच्या मालकाला मोकळ्या जागेच्या 25 टक्के रेडिरेकनर दराने किंवा बांधकामानंतर रेडिरेकनरच्या दरानुसार 15 टक्के रक्कम दिली जाणार असल्याचे रवींद्र वायकर यांनी सांगितले.

अन्यथा कठोर कारवाई

इमारत धोकादायक झाली. महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आल्यानंतरही रहिवाशांकडून इमारत रिकामी केली जात नाही. अशावेळी ही इमारत रिकामी करण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल. अशा इमारतींच्या पुनर्विकासासाठी 51 टक्के रहिवाशांच्या मान्यतेची आवश्यकता म्हाडाला असणार नाही. या परिसरात जर क्लस्टर डेव्हलपमेंटची शक्यता असल्यास विकासला चार एफएसआय देऊन इमारतींचा पुनर्विकास केला जाईल. याविषयीची अधिसूचना लवकरच काढण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या