लोकसभा निवडणुकांचे निकाल 4 जूनला जाहीर झाले आहेत. भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नसले तरी NDAला बहुमत असल्याने रविवारी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. आता भाजप मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करत असल्याने NDA तील घटक पक्षांशी त्यांना नरमाईने वागावे लागणार आहे. मात्र, रविवारी होणाऱ्या शपथविधीत अजित पवार गटाच्या एकाही मंत्र्यांचा समावेश नसल्याची चर्चा आहे. त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
मोदींच्या तिसऱ्या टर्ममधील पंतप्रधानपदाचा शपथविधीत महाराष्ट्रातील भाजपाचे 5 आणि शिंदे गटाचा एका नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. मात्र, अजित पवार गटाच्या एकाही खासदाराला मंत्रिपदाची शपथ दिली जाणार नसल्याचे समजत आहे. अजित पवार गटाला भाजपडून एक जागा ऑफर करण्यात आली होती. राज्यमंत्रिपद-स्वतंत्र प्रभार अशी ती जागा होती. पण अजित पवार गटाला राज्यमंत्री-स्वतंत्र प्रभार नको होता, अशीही चर्चा आहे. मात्र, मंत्रिमंडळाच्या विस्तारात अजित पवार गटाचा विचार नक्की केला जाईल, असेही भाजपने म्हटले आहे. अजित पवार गटाने सांगितले की यावेळी शक्य नसल्यास पुढच्या वेळी द्या, पण आम्हाला राज्यमंत्रिपदाऐवजी मंत्रिपद द्या, त्यामुळे रविवारी त्यांच्या गटातील एकाही खासदाराला मंत्रिपद मिळणार नसल्याची चर्चा आहे.
अजित पवार गटाचा केवळ 1 खासदार निवडून आला. अजित पवार गटात राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल आणि लोकसभेचे खासदार सुनील तटकरे अशा दोन खासदारांमध्ये केंद्रीय मंत्री कोण होणार यावरून वाद झाल्याचे काही सुत्रांनी सांगितले. दोघांनाही केंद्रात मंत्रिपद हवे असल्याने तटकरेंच्या दिल्लीतील बंगल्यावर यांच्यात चर्चा झाली. पण त्यावर तोडगा न निघाल्यानेच भाजपाकडून ऑफर मिळूनही या शपथविधीसाठी राष्ट्रवादीच्या खासदाराला मंत्र्यांच्या अंतिम यादीत स्थान मिळाले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.