महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यात तणावाचे वातावरण आहे. राज्यातील या सर्व घडामोडींमुळे केंद्रीय यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा घ्यावी, यासाठी केंद्रीय यंत्रणा त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत विनंती करणार आहे. केंद्रीय यंत्रणांनी याआधीही पवारांना झेड प्लस सुरक्षा स्वीकारण्याची विनंती केली होती. मात्र, शरद पवारांनी तेव्हा सुरक्षा स्वीकारण्यास नकार दिला होता.मात्र, आता पुन्हा एकदा शरद पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांनी झेड प्लस सुरक्षा स्वीकारण्याची विनंती करण्यात येणार आहे.
सीआरपीएफच्या विनंतीवर शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेबाबत शरद पवार यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्यात येणार आहे. याआधी केंद्राच्या झेड प्लस सुरक्षेवर शरद पवारांनी संशय व्यक्त केला होता. झेड प्लस सुरक्षा म्हणजे, निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते, असे शरद पवार म्हणाले होते. तसेच त्यांनी त्यावेळी झेड प्लस सुरक्षा व्यवस्था स्वीकारण्यास नकार दिला होता.