राज्य सरकारचा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न, राज्यपालांनी हस्तक्षेप करावा; नाना पटोलेंची मागणी

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्याचे वातावरण तापले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. महाराष्ट्र पेटवण्याचे काम राज्य सरकारकडून सुरू आहे. सरकारने आरक्षणाबाबत जी आश्वासने दिली ती पूर्ण केली नाहीत. आम्हाला शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा, आम्हाला सामाजिक न्यायाचा महाराष्ट्र हवा आहे. मात्र भाजपने महाराष्ट्र पेटवला आहे,असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. असा पेटवलेला महाराष्ट्र आम्हाला नकोय. त्यामुळे या सगळ्या विषयात राज्यपालांनी तातडीने हस्तक्षेप करायला हवा, अशी मागणीही पटोले यांनी केली.

फक्त छगन भुजबळच नाही, तर संपूर्ण सरकार या वादात सहभागी आहे. महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती असूनही दुष्काळ जाहीर केला जात नाही. फक्त मंत्र्यांचे तालुके दुष्काळी तालुके म्हणून जाहीर केले जात आहेत. अशा पद्धतीने राज्य चालू शकत नाही. 1 सप्टेंबरपासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू झाले आहेत, त्यावरून पाऊस किती कमी पडलाय, याचा अंदाज येतो. मात्र याकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावे, यासाठी जाणूनबुजून वेगळा वाद निर्माण केला जात आहे, असा आरोपही पटोले यांनी केला आहे.

सरकार महागाईवर बोलायला तयार नाही. नोकरभरतीबद्दलही संभ्रम आहे. मात्र, प्रसारमाध्यमांचे सगळे लक्ष मराठा आणि ओबीसी वादाकडे वळवायचे आणि सरकारने फक्त गंमत पाहावी, असा राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. सरकारच्या या भूमिकेला आमचा विरोध आहे. गृहमंत्र्यांच्या आदेशाने मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी लाठीचार्ज झाला होता आणि म्हणूनच फडणवीसांनी माफीही मागितली होती, असेही पटोले म्हणाले.

खोक्यांचं आणि भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या सरकारची नियत खराब आहे. राज्याचे एक उपमुख्यमंत्री नाराज होऊन घरी बसतात आणि नंतर एका रात्रीत त्यांचा डेंग्यू बरा होतो व ते दिल्लीत जाऊन बसतात. तिथे ते तक्रार करतात की माझ्या फाईल्स क्लिअर होत नाहीत. महाराष्ट्र सरकार कसे सुरू आहे, याचे हे उदाहरण आहे. सरकार आपल्या दारी, या कार्यक्रमासाठी ठाण्यातील एका माणसाला संपूर्ण राज्यातील कार्यक्रमांचे कंत्राट दिले जात आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी साडेतीन कोटी रुपये जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च केले जात आहेत. एकीकडे गावखेड्यात रस्ते नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, अशी परिस्थिती आहे आणि दुसरीकडे अशी उधळपट्टी सुरू आहे, अशा शब्दांत नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.