#Maharashtrapolitics काँग्रेस-राष्ट्रवादीची दिल्लीत उद्या बैठक

897

राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींचे केंद्र आता मुंबईतून नवी दिल्लीकडे सरकले असून राजकीय चर्चा-बैठका सुरू झाल्या आहेत. सोमवारी काँगेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. तर उद्या बुधवारी काँगेस आणि राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांची बैठक होणार आहे.

दिल्लीतील बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शदर पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह अन्य बडे नेते उपस्थित राहणार आहेत. हा बैठकांचा सिलसिला निर्णायक असून लवकरच सत्तास्थापनेचा पेच सुटेल, असे काँग्रेसने सांगितले.

शरद पवार आणि सोनिया गांधी यांची रविवारी होणारी बैठक काही कारणास्तव रद्द झाली होती. मात्र सोमवारी दुपारी सवाचारच्या सुमारास पवार सोनिया यांच्या दहा जनपथ या निवासस्थानी दाखल झाले. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली. या बैठकीस ज्येष्ठ काँगेस नेते ए.के. ऍण्टोनीसुद्धा उपस्थित होते. या भेटीनंतर शरद पवार यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली आणि चर्चेची माहिती दिली.

काँगेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची निवडणूकपूर्व आघाडी आहे. आम्हाला अजून अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे पवार म्हणाले. आमच्या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, कवाडे गट हे छोटे पक्षही सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा, त्यांना विश्वासात घेऊनच आम्हाला पुढे सरकावे लागेल, तूर्तास आम्ही महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असेही पवार यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या