…तर राजकारणातून संन्यास घेणार; विजय वडेट्टीवार यांना गडचिरोलीत विजयाचा विश्वास

लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर होणार आहेत. त्यामुळे या निकालाबाबत सर्वत्र उत्सुकता दिसत आहे. राज्यासह देशात भाजपविरोधी वातावरण दिसत आहे. असे असतानाही विविध माध्यमांकडून देण्यात आलेले एक्झिट पोलचे आकडे म्हणजे दाल मे कूछ काला है, असेच काहीसे आहे. मात्र, गडचिरोलीची जागा आम्ही एक लाखापेक्षा जास्त मतांनी जिंकू,असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच ही जागा आम्ही हरल्यास आपण राजकीय संन्यास घेणार, असे वडेट्टीवार म्हणाले. महाविकास आघाडी विदर्भातील दहा पैकी 10 जागा जिंकेल. तर राज्यात कमीत कमी 35 जागा आम्ही जिंकू असा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी एक्झिट पोलचे आकडे भाजपच्या बाजूने दाखवण्यात आले आहेत. लोकांनी ही निवडणूक हातात घेतली असून सरकारविरोधात जनमानसात प्रचंड संताप आहे. लोकांचा आम्हाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. असे असतानाही एक्झिट पोलची आकडेवारी बघितल्यास आणि त्यातल्या त्यात गडचिरोली लोकसभा मतदारसंघाची जागा पिछाडीवर दाखवत असेल, तर नक्कीच दाल में कुछ काला हैं, असेच म्हणावे लागेल, असे वडेट्टीवार म्हणाले.

लोकांनी सत्ताधाराविरुद्ध संताप, राग मतदानातून व्यक्त केला आहे. असे असतानाही 300 ते 400 जागा जर हे एक्झिट पोल भजपच्या बाजूने दाखवत असतील तर नक्कीच काहीतरी गडबड असायला वाव आहे. गडचिरोली मतदारसंघात पराभव झाला तर पुढची निवडणूक न लढवता राजकीय संन्यास घ्यावा, अशी आपली भूमिका असल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.