महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे स्थापन झालेले शिंदे-फडणवीस सरकार आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या बंडखोर आमदारांच्या वैधतेलाच शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवार 27 सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकारची वैधता, शिवसेनेच्या व्हीपचे उल्लंघन करून विधानसभा अध्यक्षांची निवड आणि बहुमत चाचणीवेळी मतदान करणाऱ्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करणे, शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे सुरू असणारे प्रकरण यासंदर्भातील याचिकांवर घटनापीठासमोर सुनावणीस सुरुवात होणार आहे.

सुनावणीचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग’ होण्याची शक्यता

सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायमूर्तींची अलीकडेच एक बैठक झाली. या बैठकीत घटनापीठापुढील खटल्यांच्या लाइव्ह सुनावणीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार 27 सप्टेंबरला न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या न्यायालयातील सुनावणीचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग’ सुरू होण्याची शक्यता आहे.