कुटुंब फोडलं, पार्टी फोडली, राज्यात गुंडाराज सुरू आहे, तुमचं हेच कर्तृत्व का? रोहित पवार यांचा फडणवीसांवर हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवून दिली आहे. आता विधानसभेलाही जनता भाजपला धडा शिकवणार आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. लोकसभेला जसं लोकांनी तुमचं कर्तृत्व धुवून काढलं, तसं या विधानसभेलाही लोक तुम्हाला धडा शिकवतील, असा विश्वास व्यक्त करत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर टिकास्त्र सोडले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कर्तृत्व काय आहे, असा सवालही रोहित पवार यांनी केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कर्तृत्व काय? मला त्यांचा इतिहास बघायचाय. त्यांनी कुटुंब फोडलं, पार्टी फोडली, शेतकरी आत्महत्या करतायेत, राज्यात गुंडाचं राज्य सुरू आहे, राज्यात अशी परिस्थिती असताना फडणवीस शांत बसले आहेत. हेच तुमचं कर्तृत्व आहे का? असा सवाल करत रोहित पवार यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. लोकसभेत लोकांनी जसं तुमचं कर्तृत्व धुवून काढलं तसं विधानसभेलासुद्दा लोक तुम्हाला धडा शिकवतील असं रोहित पवार म्हणाले. इतिहासात कर्तृत्वाला स्थान असते असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर रोहित पवार यांनी जबरदस्त पलटवार केला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत दिल्लीचे बादशाह आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना भटकती आत्मा असं म्हटलं होतं. मला त्यांना सांगायचे आहे की, शरद पवार हे भटकती आत्मा नाहीत, तर इथं असलेल्या सामान्य लोकांची, महाराष्ट्र धर्म टिकवणाऱ्या लोकांची, स्वाभिमानी लोकांची पवारसाहेब आत्मा आहेत. आमचा महाराष्ट्र आमचा स्वाभिमानी आहे. त्यामुळ तुम्ही कितीही ताकद लावली तरी महाराष्ट्रातील स्वाभिमानी लोकं तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.