फिफा अंडर-१७ विश्वचषकाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज

13

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुस्थानच्या यजमानपदाखाली आयोजित फिफा अंडर-१७ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या शुभारंभाला अवघे २२ दिवस उरलेले असताना मुंबईसह अवघा महाराष्ट्र विश्वचषकात सहभागी होणाऱ्या हिंदुस्थानी युवा संघाला शुभेच्छा देण्यासाठी व स्पर्धेच्या स्वागताला सज्ज झाला आहे. फिफा विश्वचषकाच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र मिशन १ मिलियन’ फुटबॉल महोत्सवाचे उद्घाटन उद्या शुक्रवार, १५ सप्टेंबर सकाळी ९ वाजता मुंबई जिमखाना येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ध्वजारोहणाने करणार आहेत. या सोहळ्य़ाला राज्याचे शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांची उपस्थिती असणार आहे.

राज्यातील १५ लाख मुले फुटबॉल मैदानावर उतरून लगावणार ‘किक’
प्रमुख महोत्सवाच्या उद्घाटनाला राज्यभरातील विविध कार्यक्रमांत व फुटबॉल लढतीत सुमारे १५ लाख विद्यार्थी व नागरिक मैदानात उतरून फुटबॉलला लाखमोलाची किक मारून युवा हिंदुस्थानी फुटबॉल संघाला शुभेच्छा देणार आहेत. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमच्या रूपाने महाराष्ट्रालाही विश्वचषक लढतींचे यजमानपद मिळाल्याने राज्यातील क्रीडाशौकीन खूश आहेत.

एमडीएफए, ‘विफा’च्या प्रयत्नांनी मुंबई फुटबॉलमय
फिफा अंडर-१७ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेआधीच एमडीएफए अध्यक्ष युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमडीएफए आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) यांनी राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबई फुटबॉलमय झाली आहे. ‘फिफा’ विश्वचषकाच्या निमित्ताने मुंबईकर क्रीडाशौकिनांमध्ये ‘फुटबॉल फिवर’ जोरात पसरू लागला आहे. जगभरातील नामवंत फुटबॉलपटूंचा खेळ या विश्वचषकात पाहायला मिळणार या जाणिवेने मुंबईकर सुखावले आहेत.

पालिका शाळांचे विद्यार्थीही उतरणार मैदानावर
फिफा अंडर-१७ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या हिंदुस्थानी युवासंघाला शुभेच्छा देण्यासाठी मुंबई महानगरपालिका शाळांतील हजारो विद्यार्थी शिवाजी पार्क, परळचे सेंट झेव्हियर मैदान, अंधेरीचे शहाजीराजे क्रीडा संकुल व मुंबईतील अन्य मैदानांत फुटबॉल खेळायला उतरणार आहेत.

राज्यभरात विविध कार्यक्रमांची मांदियाळी
– शाळा-महाविद्यालयांमधील मैदानांव्यतिरिक्त सुमारे २०० मैदानांची आखणी.
– बुलढाण्यामध्ये आजोबा, मुलगा आणि नातू असे एकाच कुटुंबातील सदस्य फुटबॉलचा सामना खेळणार आहेत.
– वांद्रे-कुर्ला संकुल येथे टाटा कर्करोग रुग्णालयामधील रुग्ण आणि विद्यार्थ्यांमध्येही फुटबॉल सामना रंगणार.
– ठाण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसमवेत आदिवासी पाड्य़ांवरही फुटबॉल सामने होणार.
– रायगडमध्ये नगराध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये नगरपालिकांच्या सर्व शाळांमध्ये फुटबॉलचा खेळ रंगणार.
– अलिबागमध्ये महिला गटांचे फुटबॉल सामने होणार आहेत. आंतरराष्ट्रीय नेमबाज सुमा शिरूर सहभागी होणार.
– सिंधुदुर्गमध्ये विद्यार्थ्यांचा समुद्रकिनारी बीच फुटबॉल तसेच केंद्रीय कारागृहातील कर्मचारी आणि कैदी यांच्यातील फुटबॉल सामना आकर्षण ठरणार.
– फुटबॉलवर आधारित चित्रकला स्पर्धेचे आयोजन.
– कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत न्यू पॅलेस मैदानावर ६० संघांचे सामने रंगणार असून त्यासाठी ६० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक. शहरभर तालमी-मंडळांमध्ये फुटबॉल लढती रंगणार.
– सोलापूरमध्ये सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये आंतरवर्ग स्पर्धांचे आयोजन.
– पुण्यामध्ये सवाशेहून अधिक फुटबॉल क्लब या उपक्रमात सहभागी, मध्यवर्ती कारागृहातील फुटबॉल सामना, पोलिसांचा फुटबॉल सामना, मुला-मुलींना शाळेत सोडण्यास येत असलेल्या रिक्षावाले काकांचा फुटबॉल सामना आणि फ्री-स्टाइल फुटबॉल जगिलग या क्रीडा प्रकाराची प्रात्यक्षिके हे आकर्षण ठरणार.
– उत्तर महाराष्ट्र-नाशिक विभागातील सुमारे एक लाख मुले-मुली फुटबॉल महोत्सवामध्ये सहभागी होणार.
– अमरावतीमध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळासह विभागीय क्रीडा संकुलामध्ये मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या