महाराष्ट्र श्री स्पर्धेत सुनीत जाधवचा चौकार

136

कोल्हापूर – प्रत्येक गटात कांटे की टक्कर… गटविजेता निवडताना जजेसचा उडालेला गोंधळ… अन् जेतेपदाच्या लढतीसाठी गटविजेते मंचावर येताच सुनीत… सुनीत… चा झालेला जयघोष सांगून गेला की यंदाही सुनीतच जिंकणार. महाराष्ट्र श्रीचा थरार अनुभवण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी करणाऱया ठाणेकरांची मनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून आलेल्या पीळदार खेळाडूंनी जिंकले. सर्वांच्या अपेक्षांवर खरा ठरत सुनीत जाधवच नंबर वन ठरला आणि तोच भारी ठरला.सुनीतने ठाण्याच्या तलाव पाली येथील शिवाजी मैदानात झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत आपल्याच नावाचा धमाका करत सलग चौथ्यांदा बाजी मारत नवा विक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी फक्त सुहास खामकरनेच हा पराक्रम करून दाखवला आहे.

ठाण्यात प्रथमच झालेल्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत राज्यभरातील १४० पीळदार आणि दमदार खेळाडूंची उपस्थिती लाभली. प्रबोध डावखरे यांच्या सहकार्यामुळे नायट्रो वेलनेस आणि फिटनेसच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत शरीरसौष्ठवपटूंसह स्पोर्टस् फिजीक प्रकारात महिला आणि पुरूष गटाच्याही स्पर्धा ठाणेकरांना पाहाता आल्या.प्रथमच महाराष्ट्र श्रीचा थरार ठाणेकरांना अनुभवायला मिळाला. ठाण्याचे शिवाजी मैदान राज्याच्या कानाकोपऱयातून आलेल्या शरीरसौष्ठवपटूंच्या सहभागाने दुमदुमले होते. त्यांची पोलादी छाती आणि त्यांचे पीळदार स्नायू पाहण्यासाठी लोटलेली गर्दी स्पर्धा लय भारी असल्याचेच सांगत होते. प्रत्येक गटात अव्वल स्थान पटकावण्यासाठी लागलेली चढाओढ पाहून महाराष्ट्र श्रीचा निकाल काहीसा अनपेक्षित लागेल असे वाटत होते. मात्र सुनीत जाधव महेंद्र चव्हाण आणि सागर कातुर्डेपेक्षा सरस ठरला. खरं सांगायचं तर सुनीत जाधवसमोर एकही खेळाडू त्याच्या तोडीचा वाटत नव्हता. इतकी जबरदस्त तयारी सुनीतची दिसून आली.

स्पर्धा महाराष्ट्राची असली तरी मुंबई आणि उपनगरच्या शरीरसौष्ठवपटूंसमोरच कुणाचीही निभाव लागला नाही. दहा गटांपैकी तीन गटात मुंबईने सुवर्ण जिंकले तर चार गटात मुंबई उपनगरने यश संपादले. स्पर्धेत ८५ किलोवरील वजनीगटात सर्वात थरारक फाइट झाली. जेतेपदाचे दावेदार असलेल्या महेंद्र चव्हाणने कालच मुंबई श्री झालेल्या अतुल आंब्रेवर मात करीत बाजी मारली. काही गटांमध्ये मुंबई आणि उपनगरच्या खेळाडूंना सातारा, पश्चिम ठाणे आणि पुण्याच्या खेळाडूंकडून लढत मिळाली. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा व्यायाममहर्षी मधुकरराव तळवलकर, इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनचे चेतन पाठारे, महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे विक्रम रोठे, राजेश सावंत, मदन कडू, आयोजक प्रबोध डावखरे आणि शरीरसौष्ठवाचे आयकॉन श्याम रहाटे, सुहास खामकर व संग्राम चौगुले यांच्या उपस्थितीत पार पडला.

सुनीत पहिलाच महाराष्ट्र श्री

भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणाऱया सुहास खामकरने आजवर सर्वाधिक आठवेळा महाराष्ट्र श्रीचा बहुमान पटकावला आहे तर त्यापैकी सहा जेतेपद त्याने सलग जिंकून डबल हॅटट्रीकचा अवघड विक्रम प्रस्थापित केला आहे. आता सुनीतने त्याचा विक्रम मोडण्याच्या दिशेने पाऊल टाकले असून सलग चौथ्यांदा महाराष्ट्र श्री जिंकणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. सलग चौथ्यांदा महाराष्ट्र श्री जिंकून सुनीतने सुहासच्या विक्रमाचा पाठलाग कायम ठेवला आहे. आता त्याला सुहासच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी आपल्या कामगिरीतील सातत्य पुढील दोन्ही वर्षे कायम राखावे लागेल. हे त्याच्यासाठी फार मोठे आव्हान असेल.

महाराष्ट्र श्री २०१७ शरीरसौष्ठव स्पर्धेचा निकाल

५५ किलो वजनी गट ः 1. संदेश सकपाळ ( उपनगर), 2. नितीन शिगवण (उपनगर), 3. देवचंद गावडे (मुंबई), 4. जितेंद्र पाटील (मुंबई), 5. संदीप तिवडे (पुणे).

६० किलो ः 1. नितीन म्हात्रे (पश्चिम ठाणे), 2. रामा मायनाक (सातारा), 3. रोशन तटकरे (पश्चिम ठाणे), 4. उमेश गुप्ता (उपनगर), 5. हर्षद काटे (पुणे).

६५ किलो ः 1. फैयाज शेख (सातारा), 2. बप्पन दास (उपनगर), 3. प्रदीप झोरे (मुंबई), 4. मंदार सावंत (मुंबई), 5. सिद्धेश धनावडे (उपनगर).

७० किलो ः 1. प्रतिक पांचाळ (उपनगर), 2. श्रीनिवास वास्के (पुणे), 3. विलास घडवले (उपनगर), 4. मनीष ससाणे (पुणे), 5. विकास सकपाळ (मुंबई).

७५ किलो ः 1. संतोष भरणकर (मुंबई), 2. रोहन गुरव (मुंबई), 3. सोमनाथ जगदाळे (सातारा), 4. सुशील मुरकर (उपनगर), 5. इम्तियाझ नजीर (अहमदनगर).

८० किलो ः 1. सागर कातुर्डे (मुंबई), 2. सुशांत रांजणकर (मुंबई), 3. सचिन पुंभार (पश्चिम ठाणे), 4. स्वप्निल मांडवकर ( उपनगर), 5. सचिन चोपडे (पुणे).

८५ किलो ः 1. सुजन पिळणकर ( उपनगर), 2. सकिंदर सिंग (उपनगर), 3. संदेश नलावडे (पुणे), 4. कृष्णा कदम (पुणे), 5. अमित माळवदे (सातारा).

९० किलो ः 1. सुनीत जाधव (मुंबई), 2. अरूण नेवरेकर (उपनगर), 3. जयवंत पारधे (नाशिक), 4. तेजस गोळे (नवी मुंबई), 5. संकेत लंगरकर (कोल्हापूर).

९५ किलो ः 1. महेंद्र चव्हाण (पुणे), 2. अतुल आंब्रे (मुंबई) , 3. जुबेर शेख (पुणे), 4. नीलेश दगडे (उपनगर), 5. श्रीदिप गावडे (मुंबई).

महाराष्ट्र श्री ः सुनीत जाधव

प्रगतीकारक खेळाडू ः महेंद्र चव्हाण

स्पोर्टस् फिजीक (महिला) ः 1. हरलिंग सेंठी (उपनगर), 2. दिपाली ओगले (मुंबई), 3. जान्हवी पांडव (ठाणे), 4. कविता नंदी (पुणे), 5. मोनिका जैन (मुंबई).

स्पोर्टस् फिजीक (पुरूष) ः 1. निलेश बोंबले (पुणे), 2. मनोज पाटील ( उपनगर), 3. रोहन कदम (उपनगर), 4. राज सावंत (उपनगर), 5. मंगेश गावडे (मुंबई).

आपली प्रतिक्रिया द्या